जव्हार : जव्हार, मोखाडा, विक्रमगड, मनोर, वाडा येथील मोठ्या शहरांना जोडणारे मुख्य रस्ते खड्डेमय झाले असून त्याचा वापर करणे धोकादायक झाले आहे. त्यांची तातडीने दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा जव्हारकरांनी दिला आहे.या रस्त्यांवरून सतत अवजड वाहने तसेच छोट्या-मोठ्या गाड्याही धावतात. त्यात खराब रस्त्यांमुळे अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यांची चांगल्या ठेकेदारांकडून कामे करून घ्यावीत, अशी जनतेची मागणी आहे. एकीकडे तालुक्यातील मुख्य रस्त्यांची पुन्हा दुरुस्ती सुरू झाली आहे. तर दुसरीकडे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे रडगाणे सुरू झाले आहे. परंतु, प्रशासन मात्र गाढ निदे्रत आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यांवर मोठमोठे अपघात होऊन शेकडो नागरिकांचा जीव गेला आहे. मात्र, प्रशासन नेहमीप्रमाणे ठेकेदारांशी संगनमत करून निकृष्ट दर्जाच्या रोडचे काम करून सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहे.याच रस्त्यांवरून अधिकारीवर्ग ये-जा करीत असतो. वेळोवेळी मंत्री, आमदार, खासदार, कलेक्टर आदी बडे अधिकारी येऊन गेले, परंतु त्यांना रस्त्यांवरील खड्डे दिसले की नाही किंवा बघून त्यांनी डोळेझाक केली आहे? यावर काही ठोस उपाययोजना करता येईल की नाही, असे संतप्त सवाल येथील नागरिक करीत आहेत. यात जे-जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई होईल का, लवकरात लवकर रस्ते दुरुस्त होतील का, असे अनेक प्रश्न जनतेला भेडसावत आहेत. (वार्ताहर)
जव्हार : रस्ते सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन
By admin | Updated: December 1, 2014 23:02 IST