जव्हार : जव्हार नगर परिषदेतील राजकीय भूकंपामुळे गेले १० दिवस जिल्ह्यातील राजकिय वातावरण अक्षराश: तापले होते, त्याला आज स्वल्पविराम मिळाला खरा, परंतु सोमवार २९ डिसेंबर रोजी मंजूर झालेल्या अविश्वासाला राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी आव्हान देत हायकोर्टात याचिका दाखल केल्याने राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा कलाटणी मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.जव्हार नगर परिषदेत एकूण १७ नगरसेवक असून, पक्षीय बलाबल राष्ट्रवादी १४, शिवसेना २, तर कॉग्रेसचा १, निवडून आलेला आहे. १७ पैकी राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीला नगर परिषदेत निर्विवाद बहुमत प्राप्त झाले, परंतु सत्तेत बसल्यानंतर अवघ्या दोन वर्षातच पक्षातील नगरसेवकात बेबनाव निर्माण होण्यास सुरूवात झाली, अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या मनमानी कारभाराचे कारण देत पक्षातीलच दहा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे वेगळा गट स्थापून व अविश्वास ठराव दाखल करण्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले, ते स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांनी २९ डिसेंबर रोजी अविश्वास ठरावाची बैठक नगर परिषदेत सकाळी ११.०० वा. पिठासीन अधिकारी सुशील खोडवेकर यांना नेमून बैठक घेण्यात आली, त्यावेळी नगराध्यक्ष पदाला राष्ट्रवादीचे १० नगरसेवक, कॉग्रेसचे १ नगरसेवक, शिवसेनेचे २ नगरसेवक यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने बोटवर करून मतदान केले. यावेळी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह दोन नगरसेवक हे गैरहजर होते. जव्हारच्या या राजकीय घडामोडींना सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा, आमदार शांताराम मोरे, ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, पालघर जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे जातीने हजर होते, कारण या सर्व घडामोडीत शिवसेनेने महत्वाची भूमिका बजावली होती, जव्हार नगर परिषदेच्या ९६ वर्षाच्या इतिहासात ऐवढी मोठी राजकिय उलथापालथ प्रथमच होत असल्याने, शेकडो नागरीकांनी नगर परिषद कार्यालयाबाहेर तुफान गर्दी केली होती. अविश्वास ठराव मंजूर होताच शिवसेना तसेच फुटीरवादी राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाने चौकाचौकात फटाके वाजवून आनंद साजरा केला, परंतु अवघ्या काही मिनटांतच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष गटाने देखील फटाके वाजविल्याने आश्चर्य व्यक्त होत, नागरीकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अखेर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुनिल भुसारा यांनी प्रसिध्दी माध्यमासमोर येऊन अविश्वास ठरावाच्या प्रक्र्रियेस आम्ही याचिका दाखल केली होती, त्यास हायकोर्टाने स्थगिती दिली असल्याची माहिती दिली, हा आमचा नैतिक विजय असल्याचे स्पष्ट केले. (वार्ताहर)जव्हारमधील राजकीय घडामोडीचा चेंडू न्यायालयातजव्हारचे नगराध्यक्ष रियाज युसूफ मनियार यांनी राष्ट्रवादीच्या १० नगरसेवकांनी स्थापन केलेल्या जव्हार विकास आघाडी गटा विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती, या याचिकेवर सोमवार दि. २९/१२/२०१४ रोजी सायंकाळी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली, सुनावणी दरम्यान न्यायालयाने नगराध्यक्षांच्या विरोधात झालेली बैठक बेकायदेशीर असल्याने ती रद्द करण्यात आल्याचे म्हटले असून याबाबतची पुढील सुनावणी ६ जानेवारी २०१५ रोजी होणार असल्याचा निर्णय दिला आहे.दोन वर्षामध्ये नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या मनमानीमुळे आम्ही नगराध्यक्षां विरूध्द अविश्वास ठराव मांडला होता, तो आम्ही शिवसेनेच्या व कॉग्रेसच्या मदतीने एकमताने मंजूर करून घेतला आहे.- रविंद्र चावरे, गटनेते, जव्हार लोकशाही आघाडी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सोमवारी सकाळी आम्ही नगर परिषदेच्या कार्यालयात बैठक आयोजित केली होती, त्यावेळी नगराध्यक्षां विरूध्द व अविश्वासाच्या बाजूने १३ नगरसेवकांनी मतदान केल्यामुळे अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे.- सुशील खोडवेकर, पिठासिन अधिकारी, जव्हार
जव्हार नगराध्यक्षांच्या विरूद्ध अविश्वास मंजूर
By admin | Updated: December 29, 2014 23:05 IST