Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालाडच्या शाळेसमोर पालकांचा ‘जवाब दो’ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांचे ‘ऑनलाइन’ शिक्षण रोखल्याचा आरोप मालाडच्या जेडीटी इंग्लिश शाळेवर करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांचे ‘ऑनलाइन’ शिक्षण रोखल्याचा आरोप मालाडच्या जेडीटी इंग्लिश शाळेवर करण्यात येत आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी पालकांनी ‘जवाब दो’ मोर्चा काढला ज्यात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

मालाड पूर्वच्या कुरार गावामध्ये ही शाळा आहे. विद्यार्थ्यांनी शाळेची फी न भरल्याने काही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण शाळेने रोखल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार, शाळेचे शुल्क विद्यार्थ्यांनी न भरल्यास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे बजावण्यात आले आहे. तसेच जे लोक उशिरा फी भरतात त्यांच्याकडून दंडही आकारला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचेच उत्तर मागण्यासाठी व एकंदर या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी शाळेच्या गेटला पालकांनी घेराव घातला.

बराच प्रयत्न करूनसुद्धा शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना शर्मा यांनी खाली येऊन पालकांशी चर्चा केली नाही. निव्वळ विश्वस्थांशी याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे पालकांनी सांगितले. याबाबत विचारणा करण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने शाळेच्या ०२२२८४१०९५२ या क्रमांकावर संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही. दरम्यान, कुरार पोलिसांनी या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.