मुंबई : मुखाच्या कर्करोगावरचे उपचार झाल्यानंतरही सामान्य आयुष्य जगणे त्यांना शक्य नव्हते. कारण, जबड्याचा खालचा भाग नसल्याने चेहरा विद्रूप झाला होता. पण थ्री डी तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या शस्त्रक्रियेमुळे सुभाष गुप्ता यांच्या आयुष्याला नवसंजीवनी मिळाली आहे.सुभाष यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर जबड्याच्या डाव्या बाजूच्या खालच्या भागाचे हाड काढण्यात आले होते. त्यामुळे डाव्या बाजूचा गाल आत गेला होता. शस्त्रक्रियेमुळे काही दातदेखील काढण्यात आले होते. परिणामी त्यांना खाणे शक्य नव्हते. त्याचबरोबरीने बोलतानाही त्रास होत होता. कर्करोगातून मुक्तता मिळूनही त्यांना सामान्य आयुष्य जगणे शक्य नव्हते. कर्करोगातून मुक्तता मिळाल्यावर सामान्य आयुष्य त्यांना मिळावे, यासाठी थ्री डी तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्यावर १ तासाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सुभाष यांना तयार कृत्रिम जबडा बसवण्यात आला. थ्री डी तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक गोष्टींची संरचना केली जाते. त्याच पद्धतीने सुभाष यांच्या जबड्याची संरचना करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून हे काम सुरू होते. परदेशात या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यावर आम्ही थ्री डी संरचना करणाऱ्या तज्ज्ञांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांच्याकडून जबड्याची संरचना करण्यात आली, सीटी स्कॅन करण्यात आले. संरचना पाहण्यासाठी थ्री डी प्रिंट आऊट्स काढण्यात आल्या. त्यानंतर त्या पद्धतीने जबड्याची संरचना करून कृत्रिम रचना करण्यात आली. रुग्णाला सर्व माहिती देऊन त्यानंतर तो जबडा त्यांना बसवण्यात आला, असे फोर्टीस रुग्णालयाचे आॅन्कोलॉजी सर्जन डॉ. शिशीर शेट्टी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
थ्री डी तंत्रज्ञानाने तयार केला जबडा
By admin | Updated: July 29, 2015 03:34 IST