Join us  

जावेद अख्तरांचा 'संडे मुशायरा' आणि सचिन पिळगावकरांचा 'मेरा सफर' लक्ष वेधणार

By संजय घावरे | Published: December 11, 2023 8:47 PM

भारतीय संस्कृती आणि साहित्यावरील 'मिरास'

मुंबई- मागील दशकभरापासून भारतीय भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचे संवर्धन आणि प्रसार करणाऱ्या 'पासबान-ए-अदब'च्या वतीने 'मिरास - फेस्टिव्हल ऑफ हिंदुस्थानी कल्चर अँड लिटरेचर'चे आयोजन करण्यात आले आहे. १६-१७ डिसेंबर रोजी रंगणाऱ्या या दोन दिवसीय महोत्सवात भारतीय साहित्य आणि कविता-संगीत क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

नरिमन पॉइंट येथील वाय. बी. चव्हाण सभागृहात सकाळी १० ते रात्री १० या वेळेत कलाप्रेमींना 'मिरास'चा विनामूल्य आनंद लुटता येणार आहे. या महोत्सवामध्ये विद्यार्थी, होतकरू लेखक आणि  कवी सहभागी होणार असून साहित्य आणि संगीत क्षेत्रांतील मान्यवरांसमोर ते आपले साहित्य आणि कला सादर करतील. शनिवारी पहिल्या दिवसाची सुरुवात आंतर महाविद्यालयिन कविता स्पर्धेने होणार आहे. त्यात नवीन प्रभाकर प्रमुख पाहुणे असतील.

कवी नोमान शौक, पटकथालेखक रुमी जाफरी, आयआरएस -मुंबईच्या कस्टम विभागाचे उपायुक्त शेख सलमान या सत्राचे परीक्षक असतील. यात रुईया, रुपारेल, झेवियर, विल्सन, मिठीबाई, रिझवी, खालसा, एसआयइएससह ३० महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी होतील. व्यवसाय मार्गदर्शन सत्रात 'टीआयएसएस'चे माजी उपसंचालक प्रो. अब्दुल शाबान, युटीआय असेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्य अधिकारी इम्तियाझुर रहमान, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खलीद, लेक्झीकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासिर शेख, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते रहमान अब्बास, एलआयसीचे माजी व्यवस्थापकीय संचालक राजकुमार आणि कॉन्झर्व्हेटिव्ह डेन्टिस्ट्री अँड एन्डोडोंटिक्सचे विभाग प्रमुख डॉ. सय्यद अब्रार बशीर सहभागी होणार आहेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या किरकोळ विक्री विभागाचे महाव्यवस्थापक अलोक अविरल या सत्राचे सूत्रसंचालन करणार आहेत.  त्यानंतर हिंदुस्थानी साहित्य प्रश्नमंजुषा होणार असून 'मेरा सफर' या प्रेरणा कथन मालिकेत ज्येष्ठ अभिनेते कवलजीत सिंग अभिनय प्रवासाबद्दल बोलतील. कथक व गझलमध्ये नीरजा आपटे आणि त्यांची टिम सहभागी होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातील. पहिल्या दिवसाची सांगता 'द सॅटर्डे  मुशायरा'ने होणार आहे. 

दुसऱ्या दिवसाची सुरुवात 'बेत बाझी' या कवितांच्या अंताक्षरीने होईल. त्यानंतर कवी मजाझ लखनवी यांच्या जीवनावरील अभिनेते कुमूद मिश्रांची निर्मिती असलेले 'मजाझ जिंदा है' नाटक सादर होणार आहे. याची पटकथा, संकल्पना आणि दिग्दर्शन सलीमा रझा यांचे आहे. ओपन माईक या व्यासपीठावर कविता सादर होतील. यात एम. एम. फारुकी अर्थात 'लिलिपुट', अल्पसंख्यांक विभागाचे उप सचिव मोईन ताशिलदार, मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंते रिझवान अहमद यांचा समावेश असेल.  कथाकथनाच्या विस्मृतीत गेलेल्या कलेवरील दस्तांगोई हे सत्र होईल. काफिला जाफरी 'दास्तान-ए-इश्क' सादर करतील. 'मेरा सफर' या प्रेरणादायी कथनाच्या मालिकेत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सचिन पिळगावकर सहभागी होतील.  हिंदुस्थानी भाषांचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या कंपन्यांसह कलाकारांना साहिर लुधियानवी पुरस्कार देण्यात येतील. 'संडे मुशायरा'मध्ये जावेद अख्तर, अझम  शाकरी, ज्योती त्रिपाठी, खान शमीम, मुझद्दर अब्दाली, नोमान शौक, ओबेद आझमी, कैसर खालिद, रणजित चौहान, सचिन पिळगावकर आणि तारा इकबाल सहभागी होतील. 'सतार विथ सरगम'मध्ये ग्रॅमी  पुरस्कार नामांकन प्राप्त उस्ताद शुजात हुसेन खान परफॉर्म करतील.

टॅग्स :जावेद अख्तरसचिन पिळगांवकरमुंबई