Join us
Daily Top 2Weekly Top 5

जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रसिद्ध गीतकार, लेखक, कवी जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रसिद्ध गीतकार, लेखक, कवी जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून वादाला तोंड फुटले आहे. भाजपने त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करतानाच अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे, असे म्हटले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच आहे, असे विधान अख्तर यांनी केल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले. भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले, अख्तर यांचे हे विधान म्हणजे बेशरमपणाचा कळस असून, समस्त हिंदू समाजाचा अपमान आहे. त्यांनी आपले विधान मागे घ्यावे आणि हिंदू समाजाची क्षमा मागावी. अन्यथा बदनामीचा खटला दाखल केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

जावेद अख्तर यांचे विधान निषेधार्ह आहे. त्यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे, म्हणजे वस्तुस्थिती लक्षात येईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना देशप्रेम, सेवाभावाचे संस्कार रुजविणारे विद्यापीठ आहे. समाजातील शेवटच्या घटकाच्या, वंचितांच्या कल्याणासाठी ती काम करते. अख्तर यांनी हे वादग्रस्त विधान मागे घ्यावे, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

............

काय म्हणाले अख्तर?

- ज्या पद्धतीने तालिबानी मुस्लीम राष्ट्र निर्माण करण्यासाठी हिंसक प्रयत्न करीत आहेत, तशाच प्रकारे आपल्याकडे काही जण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडताना दिसतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसक आहेत. रानटी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत.

- देशातील काही मुस्लिमांनी अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यावर त्याचे स्वागत केले. हे खूप धक्कादायक होते. भारतातील मुस्लिम तरुण चांगले जीवन, रोजगार, शिक्षणाच्या मागे लागले आहेत. पण मुस्लिमांचा एक गट असा आहे, जो स्त्री-पुरुषांत भेदभाव करून समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करीत आहे.

- भारतातील बहुतांश लोकसंख्या ही धर्मनिरपेक्ष विचारांची आहे. ते सभ्य असून एकमेकांचा आदर करतात. त्यामुळे त्यांना तालिबानी विचार आकर्षित करू शकत नाहीत. म्हणूनच भारत आता आणि भविष्यातही कधीच तालिबानी बनू शकणार नाही, असे जावेद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.