Join us  

बीकेसीमधील भूखंडासाठी जपानी कंपनीची २,२३८ कोटींची बोली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 6:05 AM

मुंबई शहरातील वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) तीन एकर क्षेत्राच्या एका भूखंडासाठी जपानच्या सुमिटोमो कंपनीने तब्बल २,२३८ कोटी रुपयांची बोली लावली आहे.

मुंबई : शहरातील वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) तीन एकर क्षेत्राच्या एका भूखंडासाठी जपानच्या सुमिटोमो कंपनीने तब्बल २,२३८ कोटी रुपयांची बोली लावली आहे. या बोलीनुसार, एकरी ७४५ कोटी असा भाव पडत असून, मुंबईतील भूखंडाची ही आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक किंमत ठरली आहे.सूत्रांनी सांगितले की, सुमिटोमो समूहाच्या या बोलीमुळे मुंबईतील सुस्त मालमत्ता बाजार ढवळून निघाला आहे. एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या भूखंडासाठी सुमिटोमोची एकमेव निविदा प्राप्त झाली आहे. या बोलीची प्रक्रिया सध्या पार पाडत आहोत.जिओ गार्डनला लागून असलेला या भूखंडासह इतर दोन भूखंड अनेक महिन्यांपासून विक्रीसाठी ठेवले होते. मात्र, त्याला खरेदीदारच मिळत नव्हता. स्थानिक विकासक रोखीच्या समस्येने ग्रस्त असल्यामुळे मुंबईतील मालमत्ता बाजार सध्या सुस्त आहे. खरेदीदार न मिळण्यामागे हे प्रमुख कारण होते. या भूखंडाची राखीव किंमत ३.४४ लाख प्रतिचौरसमीटर इतकी ठेवण्यात आलेली होती.मालमत्ता बाजारातील एका जाणकाराने सांगितले की, सुमिटोमो समूहाने या भूखंडासाठी अवाच्यासव्वा किंमत दिली आहे. तथापि, मुंबईतील बीकेसीसारख्या प्रमुख व्यावसायिक परिसरात कंपनीला अस्तित्व निर्माण करायचे आहे, हे उघडच आहे.यापूर्वीची सर्वात मोठी बोली२0१0 मध्ये लोढा समूहाने वडाळा येथील ६.२ एकर भूखंडासाठी ४,0५0 कोटी एमएमआरडीएला देऊ केले होते. ही आजपर्यंतची सर्वांत मोठी बोली होती. लोढा समूहाच्या बोलीनुसार या भूखंडाचा एकरी भाव ६५३ कोटी निघत होता. तथापि, लोढा समूहाने रक्कम एकरकमी देण्यास असमर्थता दर्शविली होती.

टॅग्स :मुंबईजपान