पाली : पाली-खोपोली राज्य महामार्गावर आरड्याची वाडी गावाच्या हद्दीत शनिवारी रात्री दहा वाजता होंडा सिटी कारने समोरून येणाऱ्या मोटार सायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात मोटार सायकल चालक नरेश ठकाजी मोरे या युवकाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी नेत असताना वाटेतच निधन झाले. मात्र हा मृतदेह शवविच्छेदनासाठी जांभुळपाडा आणि पाली येथे नेण्यात आला. आरोग्य अधिकारी नसल्याने नातेवाईकांना बारा तास प्रवास करावा लागला.खोपोलीहून पालीकडे येत असलेली होंडा सिटी कार रात्री दहाच्या सुमारास पालीहून निघालेली मोटार सायकल हिला जोरदार धडक दिली. या अपघातात मृत पावलेल्या नरेश मोरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलिसांनी जांभुळपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री नेला. परंतु या प्राथमिक आरोग्य कें द्रात दोन वैद्यकीय अधिकारी असुन सुध्दा एकही अधिकारी उपलब्ध नसल्याचे उघड झाले. अशा वेळेस स्थानिक ग्रामस्थ व नातेवाईक यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाली येथील प्रा. आरोग्य केंद्रात आणण्यात आला. परंतु इथेही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. पाली हे तालुक्याचे ठिकाण असून एकच आरोग्य अधिकारी आहेत. एकच अधिकारी असल्याचे शनिवारी रात्री ते तातडीच्या रूग्णांसाठी १०८ नंबर रूग्णवाहिकेच्या डॉक्टरांना सांगून गेले होते. पाली येथील शवविच्छेदन केंद्राची दुरूस्ती सुरू असल्याने तिथे शवविच्छेदन होऊ शकत नाही. अशा सर्व भयानक परिस्थितीचा सामना पोलीस यंत्रणा व नातेवाईकांना रात्री करावा लागला. पुन्हा हा मृतदेह रात्री जांभुळपाडा येथे परत नेण्यात आला. सकाळी डॉ. आल्यानंतर दुपारी बारा वाजेच्या दरम्यान शवविच्छेदन केले.
जांभुळपाडा, पालीत आरोग्य अधिकारीच नाही
By admin | Updated: July 28, 2014 00:01 IST