Join us

वाहनांच्या भाऊगर्दीत कळंबोलीतील रस्ता जॅम

By admin | Updated: December 15, 2014 22:34 IST

पनवेल - सायन महामार्ग ते तळोजा लिंकला जोडणारा कळंबोली वसाहतीतील रस्ता ट्राफिक फ्री करण्याकरिता या ठिकाणी सम-विषम तारखेला पार्किंग घोषित करण्यात आले.

पनवेल : पनवेल - सायन महामार्ग ते तळोजा लिंकला जोडणारा कळंबोली वसाहतीतील रस्ता ट्राफिक फ्री करण्याकरिता या ठिकाणी सम-विषम तारखेला पार्किंग घोषित करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्यक्षात अंमलबजावणीही सुरु करण्यात आली. परंतु चारचाकी आणि हातगाड्यांमुळे येथील प्रश्न सुटण्याऐवजी आणखी गुंतागुंतीचा बनत चालला आहे.वसाहतीमधील मुख्य बाजारपेठ, शाळा, हॉस्पिटल, वाहतूकदार यांची कार्यालये, बँका व इतर स्वयंसेवी संस्थाची कार्यालये असल्याने खरेदीसाठी आलेले ग्राहक, मालाची चढ-उतार करणारी वाहने, हातगाडीवाले व आॅटोरिक्षा चालक हे त्यांची वाहने रस्त्यावर उभी करतात. त्याचबरोबर हा रस्ता फेरीवाले आणि हातगाड्यांनी हायजॅक केला आहे. परिणामी, येथे टर्मिनल असल्याने दररोज एनएमएमटी आणि बेस्टच्या बस येतात. त्यांनाही अस्ताव्यस्त पार्क केलेल्या वाहनांचा अडथळा निर्माण होत आहे, तसेच स्थानिक नागरिक, विद्यार्थी व रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका इच्छित स्थळी वेळेत पोहोचत नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार करुन नवी मुंबई वाहतूक विभागाने सम-विषम पार्किंगचा प्रस्ताव केला. नागरिकांच्या हरकती आणि सूचना विचारात घेऊन तारखांचे फलक लावण्यात आलेत, त्याचबरोबर क्रेन आणि वाहतूक पोलीस तैनात करुन सम पार्किंग न करणाऱ्या वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाईलाही सुरुवात झाली आहे. परंतु कारवाई फक्त दुचाकीवर होत असून चारचाकीला अभय दिला जात आहे. या व्यतिरिक्त दुकानांच्या समोर मोठमोठी वाहने उभे करुन रहदारीच्या वेळी माल खाली केली जात आहे. त्याच्यावर वाहतूक पोलीस कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. (वार्ताहर)