Join us  

जळगाव पालिका, जिल्हा बँक गैरव्यवहाराचा तपास एसआयटीकडे सोपवा - उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 2:57 AM

जळगाव नगरपालिका आणि जिल्हा बँकेशी संबंधित गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या पाच गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तीन आठवड्यांत गठित करावे

जळगाव : जळगाव नगरपालिका आणि जिल्हा बँकेशी संबंधित गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या पाच गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तीन आठवड्यांत गठित करावे आणि या पथकाने तपासकार्यातील प्रगतीचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर करावा, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी दिले.

न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने १८ पानी आदेशात या गुन्ह्याच्या तपास कार्यावर असमाधान व्यक्त केले. जळगाव पालिकेने राबविलेल्या वाघूर पाणीपुरवठा योजना, विमानतळ विकास प्रकल्प, जिल्हा बँकेच्या आयबीपी योजना, पालिका आणि महावीर पतसंस्थेला दिलेले कर्ज या पाच प्रकरणांमध्ये गैरव्यवहार झाल्याची फिर्याद तत्कालीन नगरसवेक दिवंगत नरेंद्र भास्कर पाटील यांनी दिली होती. २०१२ मध्ये गुन्हा दाखल होऊनही तपास होत नसल्याने त्यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर १८ एप्रिल २०१९ रोजी सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखून ठेवण्यात आला होता. हा निकाल शुक्रवारी देण्यात आला. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पथकात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या लेखापरीक्षण विभाग, जिल्हा पोलीस अधीक्षक, आयपीएस दर्जाचा पोलीस अधिकारी यांचा समावेश राहील. पाचही प्रकरणांचा स्वतंत्रपणे आणि तज्ज्ञांचा समावेश असलेल्या पथकाने तपास करावा, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

 

टॅग्स :उच्च न्यायालयजळगाव