पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची गुजराती बांधवांना घातली साद
मुंबई मा जलेबी ने फाफड़ा
उद्धव ठाकरे आपडा
पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची गुजराती बांधवांना साद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील सुमारे २५ टक्के गुजराती समाज शिवसेनेशी जोडण्यासाठी शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी कंबर कसली आहे. मुंबई मा जलेबी ने फाफड़ा उद्धव ठाकरे आपडा अशी टॅग लाइन घेत आगामी पालिका निवडणुकीसाठी गुजराथी बांधवांना हेमराज शाह यांनी साद घातली आहे. मुंबईमधील गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी नवनीत हॉल, गुजराती समाज भवन, लोटस पेट्रोल पंप समोर, ओशिवरा-जोगेश्वरी लिंक रोड, जोगेश्वरी(पश्चिम) येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी ११ गुजराती बांधवांनी हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये व्यापारी तसेच तरुणांचा समावेश होता.
हेमराज शाह म्हणाले की, सर्वभाषिकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना नेहमीच गुजराती बांधवांच्या मागे भक्कमपणे उभी राहिली असून दंगलीतसुद्धा शिवसेनेने आमचे रक्षण केले आहे. शिवसेनाप्रमुखांचा आम्हाला गर्व आहे. सर्व जाती-धर्माचा आदर करणाऱ्या शिवसेनेने चंद्रिका केनिया, मुकेश पटेल यांना राज्यसभेवर पाठवले, तर राजुल पटेल,,संध्या दोशी आणि अन्य गुजराती बांधवांना राजकीय प्रतिनिधित्व दिले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नोटा बंदी, जीएसटी यामुळे अनेक गुजराती बांधव त्रस्त असून त्यांचे उद्योगधंदे डबघाईला आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत, संयमी असून राज्याचा गाढा उत्तमप्रकारे चालवत आहेत. गुजराती बांधवांनी व व्यापारी वर्गाने आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे त्यांनी आवाहन केले.
--------------------