Join us

दुकाने व घरफोड्यांसह जैन मंदिरात चोरी

By admin | Updated: August 29, 2014 00:07 IST

ऐन गणपती उत्सवाच्या काळात चोरट्यांनी सुधागड तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून ग्रामीण भागातील दुकाने, घरे व मंदिरांमध्ये चो-यांचे सत्र सुरू केले आहे.

पाली : ऐन गणपती उत्सवाच्या काळात चोरट्यांनी सुधागड तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून ग्रामीण भागातील दुकाने, घरे व मंदिरांमध्ये चो-यांचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळे गणपती उत्साहाऐवजी चोऱ्यांची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. वावे व परळी या गावातील दोन दुकाने, घर आणि जैन मंदिरात चोरी करून लाखभर रूपये लंपास केले आहे. चोरी करताना जैन मंदिरात सी. सी. टी. व्ही. आहे, असे लक्षात येताच चोरट्यांनी कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग होत असलेला संगणकाचा पी. सी. यू. चोरून नेला आहे.सोमवारी रात्री वावे येथील विनायक पांडुरंग म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे दुकान फोडून दुकानातील तीन हजार रूपयांची नाणी पळविली. रामदास मधुकर शिंदे यांचे दुकान फोडून रोख रक्कम व अगरबत्तीचे पुडे मिळून सुमारे सहा हजार चारशे रूपयांचा ऐवज चोरला. याच रात्री रामकृष्ण म्हस्के यांचे घर फोडले. त्यात कपाटातील वीस हजार रूपये, गणपतीची चांदीची मूर्ती व शर्ट पँट चोरून नेली. एकाच रात्री तीन चो-या करून चोर पसार झाले.दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा परळी येथील जैन मंदिराचा कडी-कोयंडा तोडून दानपेटीतील दोन हजार रूपये आणि चांदीचा मुकुट चोरला. मंदिरातील सी. सी. टी.व्ही. पाहिल्यानंतर चोरट्यांनी रेकॉर्डिंग झाले असल्याचा संशय आल्यामुळे संगणकाला जोडलेला सी. पी. यू. चोरून नेला. हे सर्व घेतल्यावर जाताना बाजूच्या सोसायटीमधील दोन मोटारसायकल चोरून नेल्या. यात सुमारे अठ्ठावन्न हजारांचा ऐवज चोरला आहे, असे तपास अधिकारी पी. एस. मंडले यांनी सांगितले.गणपती उत्सवाच्या काळात सण आनंदात साजरा करत असताना नागरिकांनी आपल्याकडील दागदागिने व घर यांची सुरक्षा बाळगावी. गावात अनोळखी इसम दिसल्यास त्याची खात्री करा व अफवांवर विश्वास न ठेवता आणि अफवा न पसरविता सर्वांनी आनंदात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी केले आहे. (वार्ताहर)