Join us
Daily Top 2Weekly Top 5

जे. जे. महाविद्यालयात अध्यापकांची पदे रिक्त

By admin | Updated: September 7, 2016 03:24 IST

आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक असलेल्या मुंबईतील सर जे. जे. कला महाविद्यालयातील अध्यापकांची जवळपास ७५ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक असलेल्या मुंबईतील सर जे. जे. कला महाविद्यालयातील अध्यापकांची जवळपास ७५ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राध्यापक व अधिव्याख्यात्यांच्या एकूण ४४ पदांपैकी केवळ ११ पूर्णवेळ पदे भरण्यात आलेली आहेत. माहिती अधिकार कायद्यान्वये प्रशासनाने त्याची कबुली दिली आहे. सर जे. जे. कला महाविद्यालयात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, नाना पाटेकर, प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय तसेच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी धडे गिरविले आहेत. सध्या मात्र पुरेशा अध्यापकांअभावी शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची टीका आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे. जे. जे. कला महाविद्यालयातील एकूण शिक्षकांची मंजूर व कार्यरत पदांची माहिती गलगली यांनी मागितली होती. त्यामध्ये प्राध्यापकांची ८पैकी ७ आणि अधिव्याख्यातांची ३६पैकी २६ पदे रिक्त आहेत. तसेच हंगामी अधिव्याख्याता आणि कंत्राटी अधिव्याख्यात्यांची अनुक्रमे ६ व ९ पदे पर्यायी व्यवस्था म्हणून कार्यरत आहेत. न्यायालयीन निर्णयानंतर हंगामी अधिव्याख्याता हे पद १९९७ पासून नियमितपणे कार्यरत आहे. प्राध्यापक आणि अधिव्याख्याता पद भरण्याची जबाबदारी ही कला संचालक, कला संचालनालयातील संचालकांची असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. त्यांच्या दुर्लक्षाबाबत निषेध करीत ही पदे त्वरित भरण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावेत, अशी मागणी गलगली यांनी पत्राद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)