Join us  

आयटीआयचे सुधारित वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 6:28 AM

राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने चौथ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्चितीसाठी मुदतवाढ दिली आहे.

मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने चौथ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्चितीसाठी मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थी चौथ्या फेरीतील प्रवेश आता १६ आॅगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून निश्चित करू शकतील. मुदतवाढीमुळे आयटीआय प्रवेश प्रक्रियेच्या पुढील वेळापत्रकातही बदल होणार असून सुधारित वेळापत्रक संचालनालयाद्वारे संकेतस्थळावर विद्यार्र्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.सुधारित वेळापत्रकाप्रमाणे विहित मुदतीत अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीमध्ये संधी मिळावी यासाठी नव्याने अर्ज भरण्याची आणखी एक संधी मिळेल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी १६ आॅगस्ट संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आधीच्या अर्जात दुरुस्ती, नव्याने अर्जप्रक्रिया करून त्याची प्रिंटआउट काढून घेणे आवश्यक आहे. १७ आॅगस्ट सायंकाळी ५ वाजता नव्याने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल व विद्यार्थ्यांनाही एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.आतापर्यंत आयटीआयच्या तीन फेऱ्यांमध्ये ७० हजार ४२५ प्रवेश निश्चित झाले असून त्यातील ५४ हजार ९७८ प्रवेश हे शासकीय तर १५ हजार ४४७ प्रवेश हे खासगी आयटीआयमधील आहेत. तिसºया फेरीपर्यंत आयटीआयमधील ४९.५४ टक्के प्रवेशनिश्चिती झाली. मंगळवारी आयटीआयच्या चौथ्या कॅप राउंडमधील अलॉटमेंटची यादी जाहीर झाली आहे....त्यानंतर होणार समुपदेशन फेरीराज्यातील सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये चौथ्या फेरीच्या प्रवेशानंतर रिक्त जागांवर जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी घेण्यात येईल. या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील १७ आॅगस्ट रोजीच जाहीर करण्यात येणार आहे. या समुपदेशन फेरीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेमध्ये १९ आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत स्वत:ची हजेरी नोंदविणे बंधनकारक आहे. यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५ नंतर समुपदेशन फेरीसाठी उपस्थित उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. खासगी संस्थांमधील संस्थांस्तरावरील प्रवेशांसाठी १३ सप्टेंबरपर्यंत मुदत मिळणार आहे.

टॅग्स :आयटीआय कॉलेजशिक्षण क्षेत्र