Join us
Daily Top 2Weekly Top 5

आगामी काळात मच्छीमारांच्या सर्व प्रश्नांना न्याय देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:05 IST

भाटी येथील आयोजित चर्चासत्रात मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे प्रतिपादनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आगामी काळात मच्छीमार बांधवांचे ...

भाटी येथील आयोजित चर्चासत्रात मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आगामी काळात मच्छीमार बांधवांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून, मच्छीमार समाजातील तरुण या व्यवसायात टिकून राहण्यासाठी शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

राज्याच्या एकूण मत्स्योत्पादनात वाढ करणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट असून, सागरी मासेमारीबरोबरच भूजल मासेमारीवर भर देण्याचे व आधुनिक तंत्रज्ञान व योग्य ते प्रशिक्षण घेऊन कमीत-कमी जागेत जास्तीत जास्त मत्स्योत्पादन करण्याचे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी बुधवारी दिली.

मालाड पश्चिम भाटी गावातील भाटी मच्छिमार सर्वोदय सोसायटीच्या सभागृहात मच्छिमार बांधवांसाठी मंगळवारी (दि. १२) रात्री आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.

यावेळी मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, मढ, वेसावा व मुंबई शहर येथील ३० पेक्षा जास्त मच्छीमार संस्थांचे ८०० प्रतिनिधी या चर्चासत्राला उपस्थित होते.

उपस्थित मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींना क्रमाक्रमाने भेटून अस्लम शेख यांनी त्यांच्या समस्या समजून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना समस्या सोडविण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

यावेळी मच्छीमार नेते धनाजी कोळी, डाॅ. नेक्सन नाटके, लिओ कोलासो, संतोष कोळी, डॉ. गजेंद्र भानजी, जोजफ कोलासो, रॉनी किणी आणि इतर मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.