Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिला कौशल्याला बळकटी आणणे आवश्यक

By admin | Updated: January 6, 2017 05:01 IST

महिलांमधील कौशल्य वाखाणण्याजोगे असते, परंतु स्त्री-पुरुष भेदभावामुळे अनेकदा महिलांमधील कौशल्य झाकोळले जाते. विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना याचा अधिक फटका बसतो.

मुंबई : महिलांमधील कौशल्य वाखाणण्याजोगे असते, परंतु स्त्री-पुरुष भेदभावामुळे अनेकदा महिलांमधील कौशल्य झाकोळले जाते. विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना याचा अधिक फटका बसतो. म्हणूनच महिला कौशल्याला बळकटी आणणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी माणदेशी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.माणदेशी फाउंडेशनतर्फे पहिल्यांदाच माणदेशी महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. रवींद्र नाट्यमंदिर येथे ५ ते ८ जानेवारी या कालावधीत महोत्सव रंगणार असून, गुरुवारी या महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या वेळी झालेल्या उद्घाटन सोहळ््यात विनोद तावडे बोलत होते. याप्रसंगी निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी, चित्रपटनिर्माते आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. महोत्सवाची सुरुवात माणदेशी गजी नृत्याने झाली.विनोद तावडे म्हणाले की, ‘महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला सक्षम होत आहेत. ही आनंदाची बाब असून, महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी शिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. शिक्षणाकडे ग्रामीण महिलांनी अधिकाधिक वळायला हवे,’ असे त्यांनी सांगितले.चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणाले की, ‘शेतकरी कष्ट करतात, परंतु त्या कष्टाचे हवे ते मोल त्यांना मिळत नाही, हे दुर्दैव आहे. विशेषत: महिला उत्पादकांना पैशासोबत प्रतिष्ठा मिळणेही आवश्यक आहे. तर सिनेनिर्माता आशुतोष गोवारीकर यांनी माणदेश संस्कृतीवर स्तुती सुमने उधळली.’ ते म्हणाले की, ‘माणदेशातील हा उत्सव केवळ कला आणि नृत्य साजरा करणारा नसून, संस्कृतीची ओळख एका वेळी अनेकांना करून देणारा ठरणार आहे.’ महोत्सवात माणदेशाची खासियत असलेल्या हातमाग, हस्तकला, शिल्पकला, सेंद्रिय कडधान्य, खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. टोपल्या लाकडांच्या वस्तू, मातीची भांडी कारागीर प्रत्यक्ष बनवून दाखवत असल्यामुळे, पहिल्याच दिवशी लोकांनी गर्दी केली. चार दिवस चालणाऱ्या महोत्सवात माणदेशातील संस्कृती दाखविणारे लेजीम, कुस्ती, झांज पथक, भारुडे, कीर्तन सादरकेले जाणार आहे. (प्रतिनिधी)