Join us

आयटी अ‍ॅक्टचाही समावेश

By admin | Updated: November 30, 2014 23:46 IST

दहा वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी पिता-पुत्राविरोधात अखेर भांडुप पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यातील (आयटी अ‍ॅक्ट) कलमांनुसार गुन्हा नोंदविला.

मुंबई : दहा वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी पिता-पुत्राविरोधात अखेर भांडुप पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यातील (आयटी अ‍ॅक्ट) कलमांनुसार गुन्हा नोंदविला. या चिमुरडीला मोबाइलमधील अश्लील क्लीप दाखविण्यात आल्या होत्या. असे असूनही भांडुप पोलिसांनी आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला नव्हता. हे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भांडुप पोलिसांची कानउघाडणी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते.तेजस नार्वेकर (२५) आणि चंद्रकांत नार्वेकर (५५) अशी गजाआड असलेल्या पितापुत्राची नावे आहेत. हे दोघे भांडुपमधील एका चाळीत राहतात. तर तक्रारदार चिमुरडी आपल्या कुटुंबासह गेल्या सहा वर्षांपासून या दोघांच्या शेजारी राहत होती. हे घर आरोपींचे असून, त्यांनी ते भाड्याने दिले होते. २७ नोव्हेंबरला रात्री अचानक या चिमुरडीच्या पोटात दुखू लागले. आईने खोदून-खोदून केलेल्या चौकशीत तेजस व चंद्रकांत यांनी गेल्या वर्षभरापासून लैंगिक चाळे केल्याची धक्कादायक माहिती मुलीने आईला दिली. कोणाला सांगितलेस तर आईला ठार मारू, अशी धमकी दिल्याने ही चिमुरडी निमूटपणे दोघांकडून होणारे अत्याचार सहन करीत होती. ही माहिती मिळताच चिमुरडीच्या कुटुंबाने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तेजस व चंद्रकांतला गजाआड केले. दोघे ६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.चिमुरडीच्या जबाबात तेजसने त्याच्या मोबाइलमधील अश्लील फोटो, चित्रफिती दाखविल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे पोलिसांनी हा मोबाइल हस्तगत करून पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये धाडला आहे. दुसरीकडे आरोपी पिता-पुत्राने हे आरोप खोटे व बिनबुडाचे असल्याचा दावा चौकशीत केला आहे. दोघांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)