दीपक मोहिते, वसईवसई-विरारमधून दररोज ६० ते ७० हजार चाकरमानी रोजगारानिमित्त मुंबई, ठाणे येथे ये-जा करीत असतात. त्यांचा हा प्रवास प्रामुख्याने रेल्वेतून होत असतो. या प्रवासात त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागतात. विरार - बोरीवली दरम्यान चौपदरीकरण झाले परंतु गाड्या आणि फेऱ्यांमध्ये अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी, अपघातांची संख्या वाढली. यावर, या निवडणुकीत काही तोडगा निघणार आहे का, असे प्रश्न प्रवासी उमेदवारांना करत आहेत. येथील हजारो प्रवाशांना जीव मुठीत धरून रेल्वेप्रवास करावा लागतो. पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून मध्यंतरी जाहीर झालेल्या अपघातांच्या आकडेवारीवरून गेल्या ५ वर्षात रेल्वे अपघातात शेकडो प्रवाशांचे बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सकाळी व सायंकाळी पीक अवर्सच्या वेळी रेल्वे प्रवासी अक्षरश: जीव धोक्यात घालून प्रवास करीत असतात. ६ वर्षापूर्वी विरार-बोरीवली दरम्यान चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले. या मार्गावरून सध्या तुरळक गाड्या धावतात. परंतु प्रवाशांना मात्र फायदा झालेला नाही. यावर उपाययोजना करण्यासंदर्भात आजवर कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे यंदा प्रचारामध्ये अनेक प्रवासी उमेदवारांना रेल्वेप्रवास सुरक्षितरीत्या कसा होईल असा प्रश्न विचारत आहेत. मात्र उमेदवारांकडे आश्वासन देण्याखेरीज काहीही नसल्याचे दिसून येते.
प्रचारात रेल्वे ठरणार कळीचा मुद्दा
By admin | Updated: October 9, 2014 01:12 IST