Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी सौर कुंपण योजनेच्या मार्गदर्शक सूचना जारी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतपिकाचे नुकसान टाळण्यासाठी संवेदनशील गावांमध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक सौर कुंपणाचा लाभ देणाऱ्या योजनेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतपिकाचे नुकसान टाळण्यासाठी संवेदनशील गावांमध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक सौर कुंपणाचा लाभ देणाऱ्या योजनेच्या मार्गदर्शक सूचना लवकरात लवकर जारी कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिल्या. यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीच्या प्रस्तावासही त्यांनी मंजुरी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील मानव- वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी घेतला. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असल्याने निर्माण होणाऱ्या मानव - वन्यजीव संघर्षावर उपाययोजना सुचविण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने धोरण निश्चित करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेत सध्या ९३९ गावांचा समावेश आहे. या योजनेत आणखी काही गावांचा समावेश करण्यात यावा. या योजनेत वनालगतच्या पाच संवदेनशील गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वन सीमेवर लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात २१८ ठिकाणी सोलर बोअरवेल तयार करून त्यावर खोदतळे निर्माण करण्यात यावेत, जेणेकरून या पाणवठ्यांमुळे वन्यजिवांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल असे सांगून यासाठी लागणारा सहा कोटी रुपयांचा खर्च कॅम्पा निधीतून करण्यात यावा, असे सांगितले. जिल्ह्यात सहा ठिकाणी जंगल सफारी सुरू करण्यात आली असली तरी निसर्ग पर्यटनाला असलेला वाव लक्षात घेऊन आणखी स्थळांचा शोध घेतला जावा, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या गावानजीक वन्यजीव विशेषत: वाघांचा वावर आढळून येतो, त्याठिकाणी कॅमेरे बसवण्यात येऊन त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात यावी तसेच काही वाघांना रेडिओ कॉलर लावण्यात येऊन त्यांच्यावरही लक्ष ठेवण्यात यावे, जेणेकरून लोकांना सजग करता येईल व मानव - वन्यजीव संघर्ष टाळता येईल.