Join us  

चिंचोळ्या खिडकीतून प्रवेश करत वाचविले इसमाचे प्राण; कर्तव्याला प्राधान्य देत केलेल्या धाडसाचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 4:50 AM

लेडी सिंघम रजनी जाबरे या गेल्या २४ वर्षांपासून मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. सोमवारी रात्री ८च्या सुमारास काम उरकून बाहेर पडणार तोच बीडीडी चाळीतील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ५० वर्षीय व्यक्ती गेल्या तीन दिवसांपासून घरात अडकली आहे.

मुंबई : भोईवाडा पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या रजनी जाबरे यांनी चिंचोळ्या खिडकीतून प्रवेश करून धाडसाने बंद घरात बेशुद्धावस्थेत पडलेल्या इसमाला बाहेर काढले. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याचे प्राण वाचविले.लेडी सिंघम रजनी जाबरे या गेल्या २४ वर्षांपासून मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. सोमवारी रात्री ८च्या सुमारास काम उरकून बाहेर पडणार तोच बीडीडी चाळीतील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ५० वर्षीय व्यक्ती गेल्या तीन दिवसांपासून घरात अडकली आहे. त्यांना मदतची आवश्यकता असल्याचे कॉल आला. रजनी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील १० बाय १०च्या खोलीत तीन दिवस अडकून पडलेला तो इसम. त्यात कोरोनाचे संकट असल्याने त्याच्यामुळे आपल्याला तर काही होणार नाही ना, असा कुठलाही विचार न करता, केवळ आत असलेल्या इसमाला कसे वाचवायचे, हा विचार रजनी यांच्या डोक्यात घोळू लागला.बंद दरवाजातून आत जाणे काही केल्या शक्य होत नव्हते. रजनी यांच्या सहकाऱ्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. मात्र, हे पथक पोहोचेपर्यंत आतील इसमाला काही झाले, तर या काळजीने रजनी यांनी इमारतीच्या पाठीमागच्या बाजूला धाव घेतली. तो इसम अडकलेल्या खोलीतील किचनच्या खिडकीला लावलेला पत्रा काढून आत जाण्याचा मार्ग त्यांना दिसला. क्षणाचाही विलंब न करता पाइपवर चढून आत जाण्याचे त्यांनी ठरवले. स्थानिकांना मोबाइलचा प्रकाश दाखविण्यास सांगत एका व्यक्तीने आणलेली शिडी आणि त्यापुढे पाइपच्या आधारे वर चढून त्यांनी खिडकी गाठली. खिडकीचा पत्रा तोडून चिंचोळ्या खिडकीतून त्यांनी कसाबसा आत प्रवेश केला. खोलीतही अंधार होता. समोरच्याचे प्राण कसे वाचवायचे, एवढाच विचार त्यावेळी डोक्यात होता, असे रजनी सांगतात.खोलीच्या भिंतीचा आधार घेत त्यांनी लाइट चालू करून मुख्य दरवाजा उघडला. तेव्हा आतील बेडवर ५० वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडलेली त्यांना दिसली. रजनी यांनी सहकाºयांच्या मदतीने त्या व्यक्तीला खोलीमधून बाहेर काढताच स्थानिकांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.‘टाळ्यांच्या आवाजाने भरून आले’टाळ्यांच्या आवाजाने भरून आले, पण मी तर माझे कर्तव्य बजावले, असे सांगत रजनी जाबरे यांनी त्या इसमाला केईएम रुग्णालायत दाखल केले. वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले असून, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या कर्तबगारीमुळे रजनी यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

टॅग्स :मुंबई पोलीस