मुंबई : डच अॅनिमेशन कंपनीत सल्लागार संचालक पदावर कार्यरत असलेल्या आयरीश व्यक्तीने पवईतल्या रेनिसान्स हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. डॅरेन कॅम्पबेल (वय 4क्) असे त्यांचे नाव आहे. हॉटेलमधील खोलीतून डॅरेनने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पवई पोलिसांच्या हाती लागली आहे.
त्यात कंपनीतील एका महिला सहका:याचा उल्लेख असल्याची माहिती मिळते. कंपनीच्या कामानिमित्त गेल्या तीन आठवडय़ांपासून डॅरेन या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. सोमवारी, 8 डिसेंबर रोजी ते हॉटेल सोडणार होते. चेकआउटची वेळ लोटली तरी डॅरेन खोलीबाहेर पडले नाहीत म्हणून हॉटेल कर्मचारी त्यांना सांगण्यासाठी गेला. त्याने खोलीचा दरवाजा ठोठावला. प्रतिसाद न मिळाल्याने अन्य चावीच्या साहाय्याने त्यांच्या खोलीत प्रवेश केला. तेव्हा बाथरूममध्ये बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत डॅरेन आढळले. पोलिसांनी डॅरेन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. कालिना येथून फॉरेन्सिक चाचणी झाल्यानंतर कॅम्पबेल यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. (प्रतिनिधी)
डॅरेन यांच्या सुसाईड नोटमध्ये कंपनीतल्या सहकारी महिलेचा उल्लेख आहे. तिने काही दिवसांपूर्वी राजीनामा देत कंपनी सोडली होती. त्यानंतरही हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. या दोघांमध्ये फोनवरून बोलणोही झाले होते. तसेच एसएमएसद्वारेही दोघे बोलत होते, अशी माहिती डॅरेन यांच्या मोबाइल तपासणीत समोर आल्याचे पोलीस सांगतात. पोलिसांनी संबंधित महिलेकडे केलेल्या चौकशीत आत्महत्येच्या दोन दिवसांपूर्वी आमची भेट झाली होती. आम्ही दोघे फक्त चांगले मित्र होतो, असे तिने सांगितले.