मुंबई : सिंचन घोटाळ्यात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्नावली धाडली असून, गरज भासल्यास त्यांनाही चौकशीकरिता बोलावले जाईल , असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी सिंचनमंत्री सुनील तटकरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी सुरू आहे. मात्र चौकशीकरिता लाचलुचपत प्रबंधक विभागाच्या कार्यालयात बोलावण्याऐवजी एसीबीने त्यांना प्रश्नावली पाठवली. त्यावरून सिंचन घोटाळ्यातील नेत्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप झाला. याबाबत सह्याद्री अतिथीगृहातील एका कार्यक्रमानंतर फडणवीस म्हणाले की, कुठल्याही प्रकरणाची चौकशी जेव्हा एसीबी करते तेव्हा संबंधितांना प्रश्नावली पाठवते. त्यानंतर त्या व्यक्तीला चौकशीकरिता बोलावले जाते. पवार यांनाही तसेच बोलावले जाऊ शकते. एसीबी चौकशी उत्तम करीत असल्याचे प्रशस्तिपत्रकही त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)
अजित पवार यांनाही चौकशीस बोलावू - मुख्यमंत्री
By admin | Updated: June 6, 2015 01:16 IST