मुंबई : राज्याच्या शिक्षण विभागाने २००९ ते २०११ या कालावधीत मुंबई शहरातील शाळांमधील तुकड्या बंद पडत असल्याने त्या उपनगरात हस्तांतरित केल्या. यामुळे दोन्हीकडील तुकड्यांकरिता अनुदान तर लाटले गेलेच मात्र काही लोकप्रतिनिधींनी शिक्षकांना नोकरीला लावण्याकरिता १५ लाख रुपये घेतले. या १०२४ तुकड्यांच्या घोटाळ्याची उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांच्यामार्फत चौकशी करण्यात येत असून, चौकशीत तथ्य आढळल्यास सीआयडी चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत केली.तावडे म्हणाले की, काही लोकप्रतिनिधींनी शिक्षण विभागाला असे पत्र दिले की, मुंबई शहरातील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने शहरातील तुकड्या बंद करून उपनगरातील विनाअनुदानित शाळांमधील तुकड्या वाढवाव्या. कालांतराने या अनुदानित तुकड्या उपनगरात अनुदानावर आणण्यात आल्या. मात्र शहरातील तुकड्यांमध्ये शिकवणारे शिक्षक उपनगरातील तुकड्यांत शिकवायला गेले नाहीत. उपनगरातील तुकड्यांमध्ये नवे शिक्षक नियुक्त करताना काही लोकप्रतिनिधींनी १५ लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतली. सध्या शहरातील आणि उपनगरातील दोन्हीकडील शिक्षकांना सरकारच्या तिजोरीतून पगार दिला जात आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तावडे यांनी जाहीर केलेल्या पावती घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल विधान परिषद सभापतींना सादर झाल्याचे सांगून त्यांनी याबाबतचा चेंडू सभापतींच्या कोर्टात टोलवला. (विशेष प्रतिनिधी)
तुकड्या हस्तांतरणाची करणार चौकशी
By admin | Updated: September 4, 2015 00:47 IST