मुंबई: मुंबईतील नालेसफाईबाबतच्या तक्रारींची उपायुक्तांमार्फत नव्हे तर आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. एसआयटी नेमून चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.कालिदास कोळंबकर, अस्लम शेख आदी सदस्यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील म्हणाले की, यावर्षी नालेसफाईवर ८४ कोटी रुपये खर्च केले असून त्यापैकी १० ते १५ टक्के रक्कम कंत्राटदारांना दिलेली आहे. नालेसफाईबाबत तक्रारी आल्याने महापालिका उपायुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील पावसाळी पाणी तुंबणारी ४० ठिकाणे निश्चित केलेली असून पाणी साचू नये याकरिता आठ पंपिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत. त्यापैकी हाजीअली, इर्ला, क्लिव्हलँड येथील पंपिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. ब्रिटानिया व गजदरबंद येथील पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ब्रिटानिया पंपिंग स्टेशनचे काम युनिटी कंपनीला दिलेले आहे. माहूल व मोगरा येथील पंपिंग स्टेशन उभारणीकरिता जमीन संपादनाचे काम सुरु आहे, असे पाटील यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
मुंबईतील नालेसफाईची आयुक्तांमार्फत चौकशी
By admin | Updated: August 1, 2015 01:21 IST