Join us

भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी करा- अहिर

By admin | Updated: July 7, 2015 03:08 IST

ज्या मंत्र्यांवर आरोप झाले आहेत त्यांनी राजीनामे द्यावेत; तसेच या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सचिन अहिर यांनी केली.

मुंबई : केंद्रातील तसेच राज्यातील सत्तेत सहभागी असणारेच जिकडे तिकडे भ्रष्टाचार असल्याची भाषा करताहेत. त्यामुळे ज्या मंत्र्यांवर आरोप झाले आहेत त्यांनी राजीनामे द्यावेत; तसेच या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली.मुंबई अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अहिर यांनी भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. सत्ताधाऱ्यांविरोधातील मुद्द्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रच दिसतील, असा दावा करतानाच आगामी मुंबई महापालिका निवडणुका मात्र राष्ट्रवादी स्वबळावर लढविणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.मुंबईतील कोस्टल रोड तयार होण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षांमध्ये नामकरणावरून वाद रंगला आहे. कोस्टल रोडला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या मागणीचे आम्ही स्वागत करतो. त्याला आमचा पाठिंबा देऊ. मात्र, बाळासाहेबांच्या स्वप्नातील मुंबई कधी साकारणार, असा खोचक सवालही त्यांनी केला. हिंदुत्वाचा कैवार घेणारे पक्ष दहीहंडीच्या प्रश्नावर गप्प आहेत. भाजपाच्या आशिष शेलारांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समन्वय समितीच्या काही बैठका पक्षाच्या कार्यालयात घेण्यात आल्या. मग ही समिती सरकारी आहे की एखाद्या पक्षाची, असा सवाल करतानाच राज्य सरकारने याबाबत हस्तक्षेप करावा अन्यथा उत्सव बंद करण्याची वेळ आयोजकांवर येईल, अशी शक्यता सचिन अहिर यांनी व्यक्त केली.