मुंबई : देशातील नवोदित कंपन्यांना आयटी उद्योगातील अनुभव, नेटवर्क आणि सक्षमतेचा फायदा मिळवून देत मुंबई इनोव्हेशन हबमार्फत नवी मुंबई येथे इनोव्हेशन हब सुरू होत आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या प्रकल्पाची सुरूवात 6 ऑक्टोबरपासून होत आहे.
देशात तंत्रज्ञानातील नवोदित कंपन्यांचा आकडा वर्षागणिक
वाढत असला, तरी हा उद्योग
अजूनही म्हणावा तितका प्रगत
झाला नसल्याची खंत जेननेक्स्ट व्हेन्चर्स अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शुक्रवारी मुंबईत पार पडलेल्या परिषदेत व्यक्त केली. यावेळी जेननेक्स्ट इनोव्हेशन हब्स या नव्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. जेननेक्स्ट व्हेन्चर्स आणि मायक्रोसॉफ्ट व्हेन्चर्स यांनी भागीदारीमध्ये सुरूवात केलेल्या या प्रकल्पात शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी, उद्योजक, गुंतवणूकदार आणि कॉर्पोरेट्स असे सर्व महत्त्वपूर्ण भागधारक एकत्र आले आहेत.
प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना माशेलकर म्हणाले, ‘यातील अॅक्सिलरेटर प्रोग्रामद्वारे नवोदित उद्योजकांना सक्षम होण्यास मदत होईल. सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानविषयक सल्ल्यांसह या प्रकल्पातील नवोदित आयटी उद्योगांमध्ये निवडक आणि धोरणात्मक गुंतवणूक केली जाईल. नवोदित कंपन्यांना उद्योग क्षेत्रतील मार्गदर्शक, तंत्रज्ञान व डिझाईनविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्लग अँड प्ले ऑफीस स्पेस उपलब्ध होणार आहे.
म्हणजेच उत्तम संकल्पना असलेल्या उद्योजकाला उद्योगात यशस्वी होण्यासाठी लागणारी
सर्व संसाधने या प्रकल्पात पुरवली जाणार आहे. शिवाय उद्योग करताना देशासह जागतिक बाजारपेठेबद्दल उत्तम सल्ले देणा:या मार्गदर्शकांचा पुरवठाही या हबमध्ये करण्यात
येईल. त्यामुळे नवोदित कंपन्यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होण्यास मदत होईल.’
देशात नवनवीन संकल्पना घेऊन अनेक नवोदित कंपन्या उदयाला येत आहेत. मात्र त्या म्हणाव्या तितक्या काळ तग धरत नसल्याची खंत मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष भास्कर प्रामाणिक यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, या प्रकल्पात अशा उद्योजकांना मार्गदर्शनासोबतच प्रोत्साहन दिले जाईल.
मुंबईतील जेननेक्स्ट इनोव्हेशन हबमध्ये अॅक्सिलरेटर प्रोग्रामसाठी अर्ज करण्यासाठी उद्योजकांना 25 सप्टेंबर्पयत प्रकल्पाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. या प्रोगाममधील नवोदित उद्योजकांची पहिली तुकडी नवी मुंबई येथील हबमध्ये 6 ऑक्टोबरपासून कार्यान्वित होईल. (प्रतिनिधी)