Join us  

नव्याने अर्थसंकल्प सादर करा, महासभेत नगरसेवकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 4:52 PM

कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे, त्यामुळे प्रभागातील कामेही झालेली नाहीत. किमान प्रभागातील अत्यावश्यक कामांसाठी तरी निधी द्यावा अशी मागणी शुक्रवारच्या महासभेत नगरसेवकांनी केली. तर अर्थसंकल्प देखील नव्याने सादर करण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकाने केली.

ठाणे : कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे, त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून सादर करण्यात आलेला अर्थसंकल्पातील कामांना देखील निधी मिळेल की नाही, या बाबत शंका आहे. त्यामुळे ही विस्कटलेली ही घडी बसविण्यासाठी अर्थसंकल्प नव्याने सादर करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी केली. दुसरीकडे नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा निधी नाही तर प्रभागातील कामे करण्यासाठी अत्यावश्यक स्वरुपातील निधी द्यावा अशी मागणीही यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली.    ठाणे महापालिकेची शुक्रवारी दुसरी वेब महासभा पार पडली. महासभा सुरु होताच, कोरोनामुळे महापालिकेची जी काही आर्थिक स्थिती खालावली त्यावरुन नगरसेवकांनी काही महत्वाच्या मुद्यांना हात घातला. यामध्ये सध्या कोरोनामुळे अर्थसंकल्प मंजुर न झाल्याने प्रभाग सुधारणा आणि नगरसेवक निधीही न मिळाल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. त्यामुळे हा निधी नाही तर किमान प्रभागातील अत्यावश्यक कामे करण्यासाठी तरी निधी द्यावा अशी मागणी नगरसेवकांनी केली. शहरातील अनेक प्रभागांमध्ये रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, गटारांची दुरुस्ती बाकी आहे, यासह इतरही अत्यावश्यक कामे शिल्लक आहेत. परंतु निधीच मिळत नसल्याने ही कामे कशी करायची असा सवाल नगरसेविका आशा डोंगरे यांनी उपस्थित केला.दरम्यान या संदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाबरोबर या बाबत चर्चा सुरु असल्याचे सांगितले. प्रभागातील अत्यावश्यक कामांना प्राधान्य देऊन इतर कामे बंद करता येऊ शकतात याचीही चर्चा सुरु आहे. त्या अनुषंगाने प्रभागातील कामांना महत्व देऊन जी कामे सध्या गरजेचे नाहीत, ती सध्या थांबविण्याचेही सांगण्यात आले आहे. त्यानुसार पुढील १० ते १२ दिवसात यावर योग्य तो तोडगा काढला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. मालमत्ता करापोटी पालिकेच्या उत्पन्नात भर पडत आहे, तर आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नही सुरु आहेत. ठेकेदारांनाही आधी २५ टक्के बिले दिली जात होती. आता ५० टक्के बिले दिली जात आहेत, त्यामुळे नक्कीच यामध्ये सुधारणा होऊन प्रभागातील कामांना महत्व दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.               दुसरीकडे महापालिकेने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यात स्थायी समितीनेही काही बदल सुचविले आहेत. परंतु हे करीत असताना पालिकेचे उत्पन्न नजरेसमोर ठेवून अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. आता कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाची सांगड घालून कामे करावी लागणार आहेत. याच कारणास्तव पालिकेने पुन्हा नव्याने अर्थसंकल्प सादर करावा अशी मागणी भाजपचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी केली. परंतु एकदा सादर झालेला अर्थसंकल्प पुन्हा नव्याने सादर करता येत नसल्याचे मत कॉंग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केले. त्यामुळे लवकरात लवकर अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करावी अशी मागणीही त्यांनी केली. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकाआयुक्त