Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या आजपासून मुलाखती

By admin | Updated: March 11, 2015 00:19 IST

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात केली आहे. बुधवारपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात केली आहे. बुधवारपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असून, सुमारे ३०० इच्छुकांचे अर्ज भाजपाकडे प्राप्त झाले आहेत.महापालिका निवडणुकीचे पडघम शहरात वाजू लागले असून प्रत्येक राजकीय पक्षाने प्रभागांची चाचपणी सुरू केली आहे. त्यानुसार भाजपानेही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे भाजपा जिल्हा अध्यक्ष सी.व्ही. रेड्डी यांनी सांगितले. सोमवारी वाशी येथे भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यावेळी दोन्ही विधानसभा क्षेत्रातील प्रभागांसंदर्भात चर्चा झाली. भाजपामधून निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असणाऱ्या सुमारे ३०० जणांचे भाजपाकडे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांची मुलाखत उद्यापासून होणार आहे. त्यानंतर भाजपाचे उमेदवार जाहीर केले जाणार आहेत. तर भाजपाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर बेलापूरची, तर वैभव नाईक यांच्यावर ऐरोली विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचेही समजते. दरम्यान, महापालिका निवडणुकीत भाजपा व सेनेची युती होण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीला चीतपट करण्यासाठी दोनही पक्षाच्या स्थानिक नेतृत्वांचे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने सेना व भाजपा पदाधिकाऱ्यांच्या गोपनीय बैठका देखील सुरू आहेत. युतीतच दोनही पक्षांचे हित असल्याने भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून तसा अहवाल देखील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत पाठवला जाण्याची शक्यता आहे. मात्र युतीबाबतचा संपूर्ण निर्णय वरिष्ठांचा असल्याचे जिल्हा अध्यक्ष रेड्डी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)