Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्यीय बुलेट चोर टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:24 IST

नवी मुंबई : राज्याच्या अनेक भागांतून बुलेट चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ६४ गुन्ह्यांची ...

नवी मुंबई : राज्याच्या अनेक भागांतून बुलेट चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ६४ गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यामधील १ कोटी रुपये किमतीच्या ४४ बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत.

लॉकडाऊनच्या कालावधित व त्यानंतर होणाऱ्या वाहन चोरीत बुलेट चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अपर आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांनी विशेष तपास पथक तयार केले होते. त्यात सहायक निरीक्षक राहुल राख, रूपेश नाईक, राजू तडवी, हर्षल कदम, भगवान तायडे, रोहिदास पाटील, नीलेश केंद्रे, शशिकांत जगदाळे, रवींद्र सानप आदींचा समावेश होता. त्यांनी २२ जानेवारी रोजी वाशी सेक्टर १७ परिसरात सापळा रचला होता. यावेळी सोहेल इम्तियाज शेख (वय २८) व सौरभ मिलिंद करंजे (२३) यांना संशयास्पदरित्या वावरताना ताब्यात घेतले असता, त्यांनी बुलेट चोरीच्या उद्देशाने आल्याची कबुली दिली. त्यानुसार दुसऱ्यादिवशी त्यांचा मुख्य साथीदार अमोल ढोबळे (३५) याला महापे एमआयडीसी परिसरातून अटक केली.

ज्या नव्या कोऱ्या बुलेटचे हँडल लॉक नसेल अशी बुलेट तो अर्ध्या मिनिटात चोरायचा. यासाठी ३०० रुपयांच्या इग्निशन कीटचा वापर केला जायचा. जी गाडी चोरायची असेल त्याचे कीट काढून नवे कीट बसवताच ती गाडी चालू व्हायची. अशाप्रकारे त्यांनी सप्टेंबर २०२० पासून ते जानेवारीपर्यंत राज्यभरातून ६४ बुलेट चोरल्याचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ढोबळेचे दोन साथीदार रिकव्हरी एजंट बनून चोरीच्या बुलेटची कमी किमतीत विक्री करायचे. यासाठी त्यांनी गाडीच्या बनावट कागदपत्रांसह बनावट आरसी व इन्शुरन्स पेपर तयार केले होते. त्यापैकी १ कोटी ३० हजार रुपये किमतीच्या ४४ बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. नवी मुंबईसह ठाणे, पिंपरी-चिंचवड, पुणे, गोवा, अहमदनगर याठिकाणी या गाड्या विकण्यात आल्या होत्या.

चौकट

उघड झालेले गुन्हे

नवी मुंबई १२, ठाणे शहर १४, पिंपरी-चिंचवड १२, मुंबई ३, पुणे शहर १, पुणे ग्रामीण १, अहमदनगर १, गोवा १.

फोटो २९ बुलेट