Join us  

International Yoga Day: मुस्लीम बांधव देतो योगाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 1:07 AM

सांताक्रूझ पूर्वेकडील ‘द योगा इन्स्टिट्यूट’मध्ये योगविषयक धडे मुस्लीम बांधव इफ्तेखार अहमद फारुखी गेल्या आठ वर्षांपासून देत आहेत.

- सागर नेवरेकर मुंबई : सांताक्रूझ पूर्वेकडील ‘द योगा इन्स्टिट्यूट’मध्ये योगविषयक धडे मुस्लीम बांधव इफ्तेखार अहमद फारुखी गेल्या आठ वर्षांपासून देत आहेत. आता त्यांनी स्वत:च्या ‘ईष्व योगा अकादमी’ची स्थापना केली आहे. इफ्तेखार हे मालाड पश्चिमेकडील मार्वे रोड येथे राहत असून ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. मुस्लीम समाजात योगाला स्थान मिळावे, याकरिता इफ्तेखार परंपरा बाजूला ठेवून या क्षेत्रात सक्रिय सहभागी झाले आहेत.योगविषयी अधिक सांगताना इफ्तेखार फारुखी म्हणाले की, द योगा इन्स्टिट्यूटमध्ये जे योग शिक्षक आहेत, त्यांना मी अ‍ॅडव्हान्स योग शिकविण्याचे प्रशिक्षण देतो. आजच्या युगात प्रत्येक व्यक्ती ताण-तणावात असून, आक्रमक, भावनाहीन होत चालला आहे. तसेच अनेक रुग्णालये हाउसफुल्ल आहेत. मानसोपचार तज्ज्ञांकडे रुग्णांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. वेगवेगळे आजार उद्भवत आहेत. हे सर्व वाढत्या ताण-तणावामुळे होत आहे. ताण-तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग करणे महत्त्वाचे आहे.मन, ऊर्जा, शरीर, संवेदना इत्यादींना स्थिर ठेवण्याचे काम योग करते. जीवनात कसे जगावे, याचे मार्ग योगातून सापडतात. योगाचे प्रशिक्षण घेत असताना सुरुवातीला घरातून हवी तशी मदत मिळाली नाही. मुस्लीम समाजात योग करत नाहीत, मग तू का करतोस, अशा प्रकारचे प्रश्न समाजातून विचारले जाऊ लागले. मी घरच्यांना समजावले की, योग हा कुठल्या एका धर्माचा किंवा समाजाचा नाही. कालांतराने मला घरातील इतर सदस्यांनी यासाठी प्रोत्साहन दिले, असेही इफ्तेखार फारुखी यांनी सांगितले.

टॅग्स :आंतरराष्ट्रीय योग दिन