Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब गोस्वामी यांना अंतरिम दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:06 IST

अनव्य नाईक आत्महत्या प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना ...

अनव्य नाईक आत्महत्या प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना शुक्रवारी पुन्हा अंतरिम दिलासा मिळाला. तसेच त्यांना अलिबाग सत्र न्यायालयात उपस्थित राहण्यापासूनही वगळण्यात आले.

अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितीश सारडा यांच्यावर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. अलिबागचे वास्तुविशारद नाईक यांना त्यांचे थकीत पैसे आरोपींनी न दिल्याने त्यांनी मे २०१८ मध्ये आत्महत्या केली. गुन्हा रद्द करण्यासाठी व त्यानंतर दाखल करण्यात आलेले दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी या तिघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे होती. या तिघांनीही अलिबाग न्यायालयात उपस्थित राहण्यापासून वगळावे, अशी मागणी याचिकेद्वारे केली.

५ मार्च रोजी उच्च न्यायालयाने या तिघांना १६ एप्रिलपर्यंत अलिबाग न्यायालयात सुनावणीस अनुपस्थित राहण्याची मुभा दिली होती. मात्र, १६ एप्रिलला उच्च न्यायालयाचे कामकाज सुरू राहणार नसल्याने गोस्वामी व अन्य दोघांनी मुदतवाढ मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. अलिबाग न्यायालयात पुढील सुनावणी २६ एप्रिल रोजी होणार असल्याने तोपर्यंत अंतरिम दिलासा द्यावा, अशी विनंती गोस्वामी यांच्या वकिलांनी न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने गोस्वामी यांच्या याचिकेवरील सुनावणी २३ एप्रिल रोजी ठेवत तोपर्यंत अंतरिम दिलासा दिला.

गोस्वामी व अन्य दोघांना ४ नोव्हेंबर २०२० रोजी अलिबाग पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. उच्च न्यायालयाने जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिल्यावर गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सर्वांची जामिनावर सुटका केली.

............................