मुंबई : महागडया कार चोरून त्या विकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या अंधेरी युनीटने गजाआड केले. त्यांच्या चौकशीत मुंबई, नवीमुंबई, ठाण्यातील तब्बल २४ कारचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यापैकी तब्बल १४ महागडया गाडया हस्तगत झाल्या आहेत.रियाझ मेहबूब खान, मुरलीधर पणीकर, फैज अहमद खान आणि झाकीर हुसेन शेख अशी आरोपींची नावे आहेत. ही टोळी एकीकडे बनावट चावीने महागडया गाडया चोरे. तर दुसरीकडे बँका, विमा कंपन्यांनी ग्राहकांकडून ओढलेल्या गाडया लिलावात विकत घेत. बँकांकडून घेतलेल्या गाडया भंगारात विकल्यानंतर त्यांचा चेसी व इंजिन नंबर चोरलेल्या गाडयांवर चिकटवून त्या विक्रीसाठी काढत. पजेरो किंवा अन्य महागडया गाडया चोरल्यानंतर तशीच गाडी बँका, विमा कंपन्यांकडून मिळेपर्यंत वाट पाहात.युनीटचे वरिष्ठ निरिक्षक दिपक फटांगरे यांना या टोळीची माहिती मिळाली होती. त्यानुसार निरिक्षक पंढरीनाथ वाव्हळ, राजू कसबे, सुनील माने, सुधीर दळवी आणि पथकाने सापळा रचून कुर्ला, एलबीएस मार्गावरील एका गॅरेजमध्ये आलेल्या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. हे चौघे हुंदाई वेरना घेऊन गॅरेजमध्ये आले होते. चौकशीत ही गाडी चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. या टोळीकडून वेरना, पजेरो, क्वालीस, टव्हेरा, वॅगन आर अशा एकूण १४ गाडया हस्तगत करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या अंधेरी युनीटची या टोळीतील पुढील आरोपी व चोरलेल्या गाडया हस्तगत करण्यासाठी हैद्राबाद व युपीत रवाना झाल्याची माहिती मिळते.
कारचोरांची आंतरराज्यीय टोळी गजाआड
By admin | Updated: February 12, 2015 01:13 IST