Join us
Daily Top 2Weekly Top 5

५० लाखांच्या कर्जावर सव्वादोन लाखांचे व्याज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:15 IST

धारावीतील रहिवासी असलेल्या कनू डोंगर मकवाना (३८) यांना व्याजावर कर्ज घेणे भलतेच महागात पडले आहे.

मुंबई : धारावीतील रहिवासी असलेल्या कनू डोंगर मकवाना (३८) यांना व्याजावर कर्ज घेणे भलतेच महागात पडले आहे. ५० हजार रुपयांच्या कर्जावर सव्वादोन लाखांचे व्याज लावून पैशांच्या वसुलीसाठी त्यांना घरात घुसून मारहाण करण्यात आली आहे.वांद्रे (पूर्व) सरकारी वसाहतीत मकवाना कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांनी पत्नीच्या औषधोपचारासाठी मित्राच्या ओळखीतून धारावीच्या प्रकाश कुंचिकुर्वेकडून जानेवारी २०१८ मध्ये ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. १० टक्क्याने व्याजाने हे पैसे त्यांना देण्यात आले होते. यात व्याज देण्यास एक दिवस जरी उशीर झाल्यास कुंचिकुर्वे त्याच्याकडून ५०० रुपये दंड आकारत होता. डिसेंबर २०१८ मध्ये पत्नीचा किडनी स्टोनचा आजार बळावल्याने, तिच्या उपचाराकरिता ते गुजरात येथे राहत्या गावी गेले. त्या वेळी डिसेंबर ते मार्च असे चार महिने ते कामावरही जाऊ शकले नाहीत. त्यांनी प्रकाशलाही पैसे दिले नाहीत.एप्रिल २०१९ मध्ये ते पुन्हा कामावर हजर होताच, साधारण पहिल्याच आठवड्यात संध्याकाळच्या सुमारास प्रकाश त्याच्या साथीदारांसह घरी धडकला. त्याने सव्वादोन लाख रुपये देण्यास सांगितले. त्यांनी याबाबत जाब विचारताच त्यांना मारहाण सुरू केली. त्यांची मारहाण वाढल्याने अखेर, मकवाना यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, धारावी पोलिसांनी कुंचिकुर्वेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.