हितेन नाईक, पालघर खानावळ चालविणा-या घटस्फोटीतेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्या नंतरही येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस नाईक रत्नाकर ओगलमुगले हा फरार असून त्याला अद्याप अटक झालेली नाही. तारापूर पोलीस स्टेशन अंतर्गत सावराई गावातील एक घटस्फोटीत महिला जेवणाचे डबे बनवून ते घरोघरी देण्याचे काम करते. यावेळी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेला पोलीस नाईक ओगलमुगले यांने तिच्याशी ओळख करुन सलगी वाढविली नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या टेंभोडे येथील भाड्याच्या खोलीत नेऊन तिच्याशी अनेक वेळा संबंध ठेवले. मागच्या आठवड्यापासून आरोपीने महिलेवर अनेक वेळा अत्याचार केलेत. त्यातून इजा झाल्याने या महिलेला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर पालघर पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. त्यांनी ती तारापूर पोलीसांकडे वर्ग केली. त्या महिलेच्या सुरक्षिततेसाठी तैनात केलेल्या पोलिसांना न जुमानता आरोपीने रुग्णालयात जाऊन पीडित महिलेची जबरदस्तीने भेट घेऊन तिच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दडपण आणण्याचा प्रयत्न सतत सुरु केला. याबाबत पोलीस अधिक्षक मोहमद सुवेझ हक यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी आरोपी विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
पालघर मुख्यालयातील बलात्कारी पोलीस फरारच
By admin | Updated: January 18, 2015 23:19 IST