Join us  

कांदिवलीतील ‘त्या’ झोपडीधारकांना पंधरा दिवसांत पात्र करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 10:04 AM

झोपडीधारकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही ५९८ घरांपैकी १४२ घरे अजूनही अपात्र आहेत. 

मुंबई :कांदिवली पूर्व श्री समर्थनगर  गृहनिर्माण संस्थेच्या एसआरए प्रकल्पातील झोपडीधारकांना विकासक व प्रशासनाने  गेल्या पंधरा वर्षांपासून बेघर करून अपात्र केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. झोपडीधारकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही ५९८ घरांपैकी १४२ घरे अजूनही अपात्र आहेत. 

या विरोधात संस्थेचे  शिष्टमंडळ म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांना भेटले. त्यांनी  अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांच्या आत  पुरावे पाहून सर्व झोपडीधारकांना पात्र करण्याचे निर्देश  दिले. त्यामुळे अपात्र झोपडीधारकांना दिलासा मिळाला आहे.

मोर्चा काढण्याचा दिला होता इशारा :

या संदर्भामध्ये त्यांनी संस्थेशी आणि लोकप्रतिनिधी संपर्क करून न्यायाची मागणी केलेली आहे. त्यामुळे संस्थेने म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. विकासक दिनेश बन्सल यांच्या हुकुमशाहीमुळे झोपडीधारकांना घरापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप रहिवाशांचा आहे. 

मनसेचे बाळकृष्ण पालकर, आरपीआयचे हरीश मुत्तराज, राष्ट्रवादीचे विष्णू पवार, दिव्या विचारे, प्रकाश चव्हाण, व्यापारी असो.चे अध्यक्ष ओमप्रकाश जोशी, प्यारेलाल यादव, अर्चना पोसवाल, सावित्री दुबे यांनी मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. 

पुरावे सादर करताना फोटो काढा :

बोरीकर यांनी म्हाडा अधिकाऱ्यांना पाचारण करून अपात्र झोपडीधारकांनी पंधरा दिवसांच्या आत पात्र करा, असे निर्देश देत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. झोपडीधारकांनी आपले पुरावे सादर करताना फोटो काढून ते आपल्याकडे ठेवावेत. जर त्यावर कार्यवाही झाली नाही, तर पुन्हा आपण माझ्याकडे या, असे सांगून त्यांनी  शिष्टमंडळाचे समाधान केले.

टॅग्स :मुंबईकांदिवली पूर्व