Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यासह मुंबईत संस्थात्मक, गृह विलगीकरणातील व्यक्तींच्या संख्येत ५० टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यासह मुंबईत कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. परिणामी शहर, उपनगरांतील गृह ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. परिणामी शहर, उपनगरांतील गृह व संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्तींच्या संख्येतही ५० टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी २६ हजार ४२० व्यक्ती गृह विलगीकरणात होत्या. ही संख्या आता कमी होऊन १० हजार ७४३ इतकी झाली आहे. ६० टक्के व्यक्तींनी गृह विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली. राज्यातील कडक लॉकडाऊनमुळे आणि बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढल्यामुळे हा सकारात्मक बदल झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मागील आठवड्यात ३० हजारांच्या घरात असलेली दैनंदिन रुग्ण संख्या मागील तीन दिवसांत २० हजारांच्या टप्प्यात आली आहे. त्याचप्रमाणे मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. याविषयी, राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, राज्याच्या महत्त्वाच्या हॉटस्पॉटमधील सक्रिय रुग्ण गतीने कमी झाल्याने संसर्गाची तीव्रता कमी होत असल्याचे दिसत आहे. मुंबई, पुणे यांसारख्या ठिकाणी सक्रिय रुग्ण सर्वाधिक होते. मात्र, आता त्यात घट होत आहे. दुसऱ्या लाटेच्या तीव्र काळात संस्थात्मक विलगीकरणात ४०.४३ लाख व्यक्ती होत्या. त्याचे प्रमाण आता कमी होऊन १८.७० लाखांवर आले आहे. म्हणजेच यात आता ५४ टक्क्यांनी घट झाली आहे. परंतु, आता पुढील १५ दिवस हा संसर्ग वाढीच्या दृष्टीने धोक्याचा काळ आहे. यंत्रणांसह नागरिकांनी याविषयी अधिक खबरदारी बाळगली पाहिजे.

मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, कडक नियमांची अंमलबजावणी झाल्याने संसर्ग नियंत्रणात मोठे योगदान लाभले. मुंबईतही ६०-७० टक्के व्यक्तींनी गृह विलगीकरण पूर्ण केले आहे. गृह आणि संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्तींत मागील दहा दिवसांत मोठी घट झाली आहे. आता नियम शिथिल झाल्यानंतरही नागरिकांनी मास्कचा वापर, स्वच्छता, सॅनिटायझर वापरणे आणि शारीरिक अंतर राखणे हे नियम पाळले पाहिजेत.