Join us  

पैठणी देण्याऐवजी समस्या जाणून घ्यायला आलो, आदेश बांदेकरांचा 'माऊली संवाद'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 5:51 AM

आदेश बांदेकर : शिवसेनेच्या ‘माउली संवाद’ कार्यक्रमास बोर्डीत प्रारंभ

डहाणू/बोर्डी : पैठणी देण्याऐवजी समस्या ऐकून त्यांचे निरसन करण्यासाठी आल्याचे आदेश बांदेकर यांनी सांगितले. शिवसेना पक्षातर्फे ‘माऊली संवाद’ या कार्यक्रमातून राज्यभरातील शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरीब महिलांशी मुक्त संवाद साधला जाणार आहे. शुक्र वार, २ आॅगस्ट रोजी बोर्डी येथून याचा प्रारंभ झाला. यासाठी शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक आणि शिवसेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी सभागृहात हजर होते.

या कार्यक्रमातून शेतकरी, कष्टकरी, मजूर, अंगणवाडी सेविका, गृहिणी या महिलांच्या समस्या ऐकून शिवसेनेच्या माध्यमातून सोडविणार असून हा कार्यक्र म दुवा म्हणून कार्य करणार असल्याचे बांदेकर म्हणाले. तर शिवसेना सचिव म्हणून कामाला प्राधान्य देताना जागा वाटपाचा निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेतील असे मत जिल्ह्यातील युतीच्या जागा वाटपाबाबत व्यक्त केले. दरम्यान, डहाणूत दाखल झालो मात्र महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले नाही ही खंत तुम्हा सर्वांचा उत्साह पाहून निवळल्याचे बांदेकरांनी सांगताच महिलांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. सीमेलगतच्या झाई गावातील मच्छीमार महिलांचे रस्ता, वीज, पाणी आदी प्रश्न उषा माच्छी या कोळीणीने मांडले. यावेळी बांदेकरांनी थेट एकनाथ शिंदे यांना आवाहन केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांनी ते सोडविण्याचे आश्वासन दिले. ‘आदेश भाऊजी’ अशी हाक देणाºया महिलांकडून लेखी निवेदन घेण्याचा ओघ सुरु असताना ‘शिवसेना’ ही समस्या सोडविण्यास प्राधान्य देईल, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची समस्या सोडवावी, अशी विनंती विमल विचारे यांनी करून बांदेकरांना दखल घेण्यास भाग पाडले. दरम्यान, कासा, विक्रमगड येथील महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आदेश बांदेकरांनी जाणून घेतल्या.‘या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील अधिकाधिक महिलांच्या समस्या जाणून, त्यांचे निरसन करण्यास प्राधान्य दिले जाईल. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून राज्यभर १०२ डायलॉसिस मशिन दिली जाणार असून, हा उपक्र म अंतिम टप्यात आहे. पालघर जिल्ह्याचाही त्यामध्ये समवेश करण्यात आला आहे.’- आदेश बांदेकर, सचिव, शिवसेना पक्ष.

टॅग्स :शिवसेनाआदेश बांदेकर