Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाऐवजी अडकला पोलिसांच्या बेडीत

By admin | Updated: February 20, 2015 01:26 IST

आपल्याच लग्नासाठी दागिने चोरण्याच्या उद्देशाने ठाण्यातील पुनामिया ज्वेलर्समध्ये आलेल्या अतिश कोळी (२२) या तरुणाला ठाणेनगर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अटक केली.

ठाणे : आपल्याच लग्नासाठी दागिने चोरण्याच्या उद्देशाने ठाण्यातील पुनामिया ज्वेलर्समध्ये आलेल्या अतिश कोळी (२२) या तरुणाला ठाणेनगर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अटक केली. त्याच्याकडून पाच हजारांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.जांभळी नाक्यावरील या दुकानात तो सोमवारी गेला. त्याने ज्वेलर्सचे मालक विपुल पुनामिया यांच्यावर खेळण्यातले बनावट पिस्तूल रोखून ‘जो कुछ है दे दो, नही तो मार डालूँगा’ अशी धमकी दिली. त्यांच्याकडून पाच हजारांची रोकड हिसकावली. दुकानात गिऱ्हाईक असल्यामुळे त्यातल्याच एकाने त्याला दुकानाबाहेर ढकलले आणि आरडाओरड केली. त्यानंतर, गस्तीवरील पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. बी. सरक यांच्या पथकाने त्याच्या अंगझडतीत पाच हजारांची रोकड हस्तगत केली. त्याच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तो बेकार असून येत्या २३ फेब्रुवारीला त्याचे लग्न होणार असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. वधूसाठी दागिने चोरण्याच्या विचाराने या दरोड्याचा प्लॅन त्याने आखला होता. (प्रतिनिधी)