Join us  

मृतदेह अदलाबदल प्रकरणाची चौकशी सुरू, डॉक्टरांची चौकशी समिती पोलिसांना अहवाल सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 3:05 AM

वडाळा येथील रहिवासी असलेले अंकुश सुरवडे (२६) यांना २८ आॅगस्ट रोजी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १३ सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले.

मुंबई : सायन रुग्णालयातील मृतदेह अदलाबदल प्रकरणी सायन पोलिसांनी तक्रार नोंदवून अधिक चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी जे जे रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी समिती अधिक तपास करून त्याबाबतचा अहवाल पोलिसांना सादर करणार आहे.                  वडाळा येथील रहिवासी असलेले अंकुश सुरवडे (२६) यांना २८ आॅगस्ट रोजी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १३ सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. दरम्यान, सायन रुग्णालयातच हेमंत दिगंबर यांना १२ सप्टेंबर रोजी रुग्णालयात आणण्यात आले.अंकुश आणि हेमंत या दोन्ही रुग्णांच्या शवांची उत्तरीय तपासणी १३ सप्टेंबर रोजी सकाळी करण्यात आली. त्यानंतर दोन्ही शव रुग्णालयाच्या शवागरातच ठेवण्यात आले होते. त्यानंतर अंकुशचे कुटुंबीय दुपारी चार वाजता मृतदेह घेण्यासाठी पोहोचणार होते. मात्र त्यापूर्वीच हेमंतचे नातेवाईक रुग्णालयात आले. त्यांनी अंकुश यांचा मृतदेह हा हेमंत यांचा असल्याचे ओळखून, सर्वप्रक्रिया पार पाडून, पोलिसांच्या स्वाक्षरीनंतर नेला. प्रत्यक्षात अंकुश यांचे शव हे हेमंत यांचे शव असल्याचे समजून सोपविण्यात आले.  अंकुशचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचल्यानंतर मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे समोर आल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. त्यात अंकुशची किडनी काढल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला. मात्र रुग्णालय प्रशासनाने हा आरोप फेटाळला आहे. हे सर्व जबाब नियमानुसार जे जे रुग्णालयातील डॉक्टरांच्या चौकशी समितीपुढे सादर केले जाणार आहेत.सायन रुग्णालय प्रशासनाकडून अनवधानाने मृतदेहाची अदलाबदल झाली आहे. या प्रकरणी शवगृहातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.- डॉ मोहन जोशी, अधिष्ठाता, सायन रुग्णालय

टॅग्स :सायन हॉस्पिटल