Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश अंबानींच्या निवासस्थान परिसरात इनोव्हा चालकाची पीपीई किट घालून पुन्हा फेरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:06 IST

सीसीटीव्ही फूटेजमधून स्पष्टलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या परिसरात जिलेटिन कांड्या असलेली स्फोटकांनी ...

सीसीटीव्ही फूटेजमधून स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या परिसरात जिलेटिन कांड्या असलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सोडल्यानंतर दुसरे वाहन इनोव्हाचा चालक पुन्हा त्या ठिकाणी पाहणी करून गेला होता. ओळख लपविण्यासाठी त्याने कोविड योद्ध्याप्रमाणे पीपीई किट परिधान केले होते, असे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) तपासलेल्या सीसीटीव्ही फूटेजमधून समाेर आले.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर मध्यरात्री एक जण स्कॉर्पिओ सोडून गेला होता. त्यामध्ये २० जिलेटिनच्या कांड्या व धमकीचे पत्र होते. त्यानंतर स्कॉर्पिओचा चालक इनोव्हा गाडीतून निघून गेला. या गाडीने मुलुंड टोल नाका पार केल्यावर ती गाडी पुन्हा अँटिलिया येथे आली होती. मध्यरात्री ३ वाजून ५ मिनिटांना इनोव्हा गाडीने टाेल नाका पार करतानाचे सीसीटीव्ही फूटेज सापडले. त्यानंतर हीच गाडी अँटिलियाच्या परिसरात दिसून आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हाच्या चालकाने गाडीची नंबर प्लेट पुन्हा बदलून पहाटे मुलुंड टोल नाका ओलांडून इनोव्हा पुन्हा मुंबईत आणली. त्यानंतर इनोव्हाचा चालक पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी स्कॉर्पिओ गाडी पार्क केलेल्या ठिकाणी पोहोचला. त्याने स्कॉर्पिओची तपासणी केली आणि ताे निघून गेला. त्यानंतर पहाटे ५ वाजून १८ मिनिटांनी त्याने पुन्हा मुलुंड टोल नाका ओलांडला. ओळख लपविण्यासाठी ताे पीपीई किट घालून इनोव्हा चालवत होता. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, आम्ही यासंदर्भातील सर्व माहिती एनआयएच्या तपास पथकाला दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

------------------