Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाविरोधात अ-राजकीय मंच, यशवंत सिन्हा यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:11 IST

भाजपा सरकार कोणालाही विश्वासात न घेता जनविरोधी निर्णय घेत असल्याचे सांगत नाराज भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी शनिवारी बोलाविलेल्या बैठकीत अ-राजकीय मंचाची सहा सदस्यीय सुकाणू समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई : भाजपा सरकार कोणालाही विश्वासात न घेता जनविरोधी निर्णय घेत असल्याचे सांगत नाराज भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी शनिवारी बोलाविलेल्या बैठकीत अ-राजकीय मंचाची सहा सदस्यीय सुकाणू समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.समितीच्या समन्वयकपदी सुधींद्र कुलकर्णी व अ‍ॅड. आभा सिंह यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड, झिनत शौकत अली, सुचेता दलाल हेसुद्धा समितीत असतील. चैत्यभूमीजवळील सभागृहात झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. भाजपातील नाराज नेते खा. शत्रुघ्न सिन्हा, भाजपा आ. आशिष देशमुख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे खा. कुमार केतकर, राष्ट्रवादीचे खा. माजिद मेनन, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, आपच्या नेत्या प्रीती मेनन यांच्यासह प्रीतीश नंदी, तुषार गांधी उपस्थित होते.माध्यमे, न्यायपालिका आणि महत्त्वाच्या संस्था केंद्र सरकारने ताब्यात घेतल्याचा सूर बैठकीत व्यक्त करण्यात आला. संस्थांची स्वायत्तता जपण्यासाठी राष्ट्रीय मंचातर्फे कार्यक्रम हाती घेण्याचे ठराव बैठकीत मंजूर झाल्याची माहिती अ‍ॅड. माजिद मेमन यांनी दिली.कोल्हापूर, अकोला आणि मुंबईत आॅगस्ट क्रांती मैदानात सभांचे आयोजन केले जाणार आहे. १ मे रोजी कोल्हापूर येथे पुरोगामी बचाव मोर्चा काढण्यात येईल. ७ मे रोजी अकोला येथे शेतकरी मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

टॅग्स :यशवंत सिन्हा