मुंबई : महानगरात विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेली विकास आणि पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी दिले.
वरळी परिसरातील नेहरू सायन्स सेंटर जंक्शन, फिनिक्स मुंबई माईल फ्लायओव्हरखालील जागा, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, सयानी रोड, गोखले रोड, ॲनी बेझंट रोडवरील सौंदर्यीकरण आणि पदपथांच्या कामांचे तसेच सर पोचखानवाला रोड व खान अब्दुल गफार खान रोडला जोडणाऱ्या पायवाटेच्या सौंदर्यीकरण व नूतनीकरणाच्या कामांचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी नगरसेवक स्नेहल अंबेकर, समाधान सरवणकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, महापालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.
मुंबईच्या विकासात सर्वांचा सहभाग असावा, या ठाकरे यांच्या आवाहनानुसार राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका यांच्या निधीसह फिनिक्स मिल्स, आदित्य बिर्ला ग्रुप यांच्या सीएसआर निधीमधून कामे करण्यात येणार आहेत. या कामांची पर्यावरण मंत्र्यांनी माहिती घेतली. या परिसराचे सुशोभिकरण आणि सौंदर्यीकरण करताना टाकाऊ पदार्थांपासून सुंदर कलाकृती निर्माण करून त्यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यांचीही पाहणी करून ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले. सहायक आयुक्त उघडे यांनी कामांची माहिती दिली.