Join us  

माहिती आयुक्तांच्या जन्मदाखल्याची नोंद नाही; शैलेश गांधींनी उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 4:13 AM

सर्वसामान्यांना किती त्रास होईल

मुंबई : मुंबईत जन्मलेल्या शैलेश गांधी यांनी जन्मदाखला मिळण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केल्यावर त्यांना तुमचा जन्मदाखला मिळत नसल्याचे लेखी उत्तर महापालिकेने पाठवले आहे. केंद्रीय माहिती आयुक्तपदावर काम केलेल्या गांधी यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त करत जर ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्य नागरिकांना व ग्रामीण भागातील नागरिकांना जन्मदाखला मिळवण्यासाठी व नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी किती सव्यापसव्य करावे लागतील, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पित्याचा जन्मदाखला द्यावा लागणार आहे, असे असताना जर आम्हाला आमचाच जन्मदाखला मिळत नसेल तर देशभरात काय परिस्थिती उद्भवेल, असा प्रश्न गांधी यांनी उपस्थित केला आहे. माझा जन्मदाखला मिळत नसताना मी माझ्या वडिलांचा जन्मदाखला कसा मिळवणार, असे त्यांनी विचारले. केंद्र सरकारने नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीजन (एनआरसी) लागू करणार नाही, असे स्पष्ट केले पाहिजे किंवा किमान १० वर्षे लागू करणार नाही असे सांगावे, असे गांधी म्हणाले.

गांधी यांचा जन्म मुंबईत माटुंगा येथे ७ जुलै १९४७ रोजी झाला होता. मात्र महापालिकेकडे त्याची अधिकृत नोंद मिळत नसल्याचे उत्तर महापालिकेने पाठवल्याने गांधी यांनी सर्वसामान्यांना या प्रकरणी किती अडचणींना सामोरे जावे लागेल याकडे लक्ष वेधले आहे. गांधींना पाठवलेल्या लेखी उत्तरामध्ये एका ठिकाणी शैलेश या नावात बदल केला आहे. लेखी उत्तरामध्ये असा गोंधळ होत असेल तर इतर ठिकाणी काय होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.