Join us  

ऑनलाइन ग्राहकांना वीजबिलांच्या दुरुस्ती प्रक्रियेची माहिती एसएमएसद्वारे मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 6:27 PM

महावितरणच्या ग्राहकांना वीजबिल दुरुस्ती करण्यास अडचण होऊ नये व ही प्रक्रिया सुलभ असावी यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार महावितरणने ग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती प्रक्रिया ऑनलाइन केली आहे.

मुंबई- महावितरणच्या ग्राहकांना वीजबिल दुरुस्ती करण्यास अडचण होऊ नये व ही प्रक्रिया सुलभ असावी यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार महावितरणने ग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. या प्रक्रियेत ग्राहकांना राज्यातील महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात आपली तक्रार दाखल करता येणार असून ती तक्रार निश्चित कालमर्यादेत सोडविण्यात येणार आहे. तसेच याबाबतचा एसएमएसही ग्राहकांना देण्यात येईल.वीजबिलाच्या तक्रारी सोडविण्यासाठी ग्राहकांना प्रत्यक्ष संबंधित कार्यालयात वारंवार जावे लागते. यावर उपाययोजना करण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी ही प्रक्रिया सुलभ व ऑनलाई करण्याचे निर्देश दिले होते.या निर्देशानुसार नव्या ऑनलाईन प्रक्रियेत ग्राहकांना वीजबिलासंबंधीची तक्रार लेखी, महावितरण मोबाईल ॲप, ईमेल व व्टिटर इत्यादी माध्यमांतून मुंबई मुख्यालयासह महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात करता येणार आहे. या तक्रारीच्या सोडवणूकीसाठी मुख्यालय ते शाखा कार्यालयांपर्यन्तच्या प्रत्येक कार्यालयात विशिष्ट कर्मचाऱ्यांवर तक्रार सोडविण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तक्रार आल्यानंतर ती किमान ९ दिवसांत सोडवावी, असे निर्देश संबंधितांना देण्यात आलेले आहेत. जर ग्राहकांचे वीजबील बरोबर असेल तर त्याबाबत ग्राहकाला एसएमएस प्राप्त होईल व त्यात संबंधित वीजबील भरण्याचे आवाहन करण्यात येईल. परंतु जर ग्राहकाच्या वीजबिलात दुरुस्ती करण्याची गरज असेल तर ते वीजबील संबंधित शाखा कार्यालयात पाठविण्यात येईल. या शाखा कार्यालयामार्फत ग्राहकांच्या वीजबील तक्रारीच्या संदर्भात आवश्यक ती प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल. यानंतर सुधारणा केलेले अंतिम वीजबील ग्राहकाला एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल. हा एसएमएस दाखवून ग्राहकाला आपल्या वीजबिलाचा भरणा करता येईल.महावितरणने याबाबत परिपत्रक जारी केले असून यात ऑनलाईन वीजबील दुरुस्तीची संपूर्ण प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे. महावितरणच्या या नवीन उपाययोजनांमुळे ग्राहकांना वीजबील दुरुस्ती करणे अधिक सुलभ होईल. तसेच त्यांच्या तक्रारींचे निरसनही तातडीने होईल.