Join us
Daily Top 2Weekly Top 5

महागाईने सामान्यांची कंबरतोड!

By admin | Updated: October 26, 2015 01:19 IST

‘अच्छे दिन आयेंगे’ अशा आश्वासनांचे गाजर दाखवून मते मिळविलेल्या सत्ताधाऱ्यांच्या राज्यात सामान्यांचे जिणे मुश्कील झाले आहे.

लिनल गावडे, मुंबई‘अच्छे दिन आयेंगे’ अशा आश्वासनांचे गाजर दाखवून मते मिळविलेल्या सत्ताधाऱ्यांच्या राज्यात सामान्यांचे जिणे मुश्कील झाले आहे. ऐन सणासुदीच्या काळात अन्नधान्याचे भाव गगनाला भिडलेले असल्याने मुंबईकरांना आर्थिक गणित जुळवता जुळवता कंबरमोड करावी लागतेय. त्यात अन्नधान्याचा साठा करून भ्रष्टाचाराचे लोण आल्याने मुंबईकरांचे ‘टेन्शन’ अधिकच वाढले आहे.गेल्या काही दिवसांपासून तूरडाळीच्या भावांमध्ये झालेली लक्षणीय वाढ सामान्य जनतेच्या डोक्याला ताप झाली आहे. भारतीय जेवणात आवश्यक असलेल्या डाळीला आहारातून वगळता येणार नाही. म्हणून किराणा मालातून तूरडाळ विकत घेण्याचा आकडा ग्राहक काही किलोंनी कमी करत आहेत. बाजारात सध्या तूरडाळीची किंमत १७० पासून २२० रुपयांपर्यंत आहे. मुंबईकर १७० ते २०० किमतीच्या आतील डाळ घेणे पसंत करतात, असे अनेक किराणा माल विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दादर येथील कीर्तिकर मार्केटमधील शाह जाधवजी किराणा दुकान मालकाने सांगितले की, ग्राहक पूर्वीसारखी ५ किलो किंवा ७ किलोंची मागणी करत नाहीत तर ही मागणी आता एक किलोवर घसरली आहे. वाढत्या डाळीच्या दराचा परिणाम हॉटेलच्या ‘दालफ्राय’मध्ये थोड्या प्रमाणात झाला आहे. अनेक हॉटेलांनी यांच्या किमतीत आधीच ५ ते ७ रुपयांनी वाढ केल्याचे मान्य केले. महागाईचा फटका हॉटेल चालकांना नेहमीच बसतो. याचा आधीच विचार करून पदार्थांच्या किमती ठरत असतात. तूरडाळीच्या वाढत्या भावांचा परिणाम हॉटेलांवर झालेला नाही आणि डाळीच्या दर्जातही झालेला नाही, असे दादर येथील तृृप्ती हॉटेलच्या मालकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.डाळ हा भारतीय जेवणातला अविभाज्य घटक आहे. लहान मुलांना डाळीशिवाय जेवण आवडत नाही. डाळींच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की, ७ किलोवरून ३ किलो डाळ महिन्यासाठी खरेदी करावी लागत आहे. या डाळींच्या किमतीत घट करावी, नाही तर मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडेल.- मनीषा कदम, गृहिणी,चारकोप