Join us

परप्रांतीय मच्छीमारांची घुसखोरी

By admin | Updated: April 20, 2015 22:32 IST

महाराष्ट्राबाहेरील मच्छीमारांना समुद्र हद्दीत मच्छीमारी करू देणार नाही, असा विश्वास शासनाकडून व्यक्त केला जात असला तरी प्रत्यक्षात परराज्यातील

नांदगाव : महाराष्ट्राबाहेरील मच्छीमारांना समुद्र हद्दीत मच्छीमारी करू देणार नाही, असा विश्वास शासनाकडून व्यक्त केला जात असला तरी प्रत्यक्षात परराज्यातील मच्छीमारांची स्पीड बोटीद्वारे खुलेआम मासेमारी मात्र चालूच आहे. मुरुडच्या परिसरात याचा अनुभव नुकताच एका मच्छीमाराला आला. परप्रांतीयांनी लावलेल्या जाळीत स्थानिक मच्छीमार अडकले आणि त्या जाळ्यांतून जीव वाचवण्याचे मोठे दिव्य त्यांना करावे लागले. त्यांचे दोन लाखांचे नुकसानही झाले.मुरुड येथील सागरकन्या मच्छीमार सहकारी सोसायटीचे संचालक शैलेंद्र कुलाबकर यांना भर समुद्रात हा जीवघेणा अनुभव आला. शैलेंद्र कुलाबकर हे रामदर्शन ही मोठी नौका घेवून मुरुडच्या खोल ४० वाव समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. कुलाबकरांनी मासेमारी जाळी समुद्रात लावली. अशावेळी त्यांच्यासमोर काही अंतरावर परराज्यातील शेकडो नौका ४५० हॉर्सपॉवर स्पीडने बिनधास्तपणे मच्छीमारी करीत होत्या.परराज्यातील व्यावसायिक स्पीड बोटीद्वारे मासेमारी करीत मोठ्या प्रमाणात समुद्री धन मिळवितात. मासेमारी करून परराज्यातील या नौका त्यांच्या हद्दीकडे वेगाने रवाना होताना कुलाबकर मात्र यामध्येच अडकले होते. त्यांची जाळी किमान ५० ठिकाणी फाडून दोन अडीच लाखांचे नुकसान झाले. परराज्यातील मासेमारांवर कारवाई करण्याची मागणी सागरकन्या मच्छीमार संस्थेचे चेअरमन मनोहर बैले व व्हा. चेअरमन मनोहर मकू यांनी केली. (वार्ताहर)