सुरक्षेचा प्रश्न : रक्षकच देतात सदनिका भाड्याने
मुंबई : प्रकल्पबाधितांसाठी राखीव सदनिकांमध्ये घुसखोर अधिक असल्याचे आतापर्यंत आढळून आले आहे़ मात्र या सदनिकांच्या सुरक्षेसाठी नेमलेले रक्षकच घुसखोरांना या जागा भाड्याने देत असल्याची तक्रार सर्वपक्षीय नगरसेवकांकडून केली जात आहे़समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे याकडे लक्ष वेधले़ या सदनिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली़ या कंपनीकडूनच आर्थिक नुकसानभरपाई वसूल करण्याची सूचना मनसेचे सुधीर जाधव यांनी केली़ सभागृह नेता तृष्णा विश्वासराव यांनीही या वृत्तास दुजोरा दिला़ या सदनिकांमधून दरवाजे, खिडक्या चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आणले़ गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द या एम पूर्व वॉर्डांमध्येच असे ५० ते ७० हजार पीएपी (प्रकल्पबाधित) आहेत़ यातील घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी पालिकेने कठोर कारवाई करण्याची सूचना सदस्यांनी केली. (प्रतिनिधी)