Join us  

इंद्राणी, पीटर मुखर्जी झाले विभक्त, कुुटुंब न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 6:09 AM

शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी व तिचा पती पीटर मुखर्जी हे अखेर विभक्त झाले.

मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी व तिचा पती पीटर मुखर्जी हे अखेर विभक्त झाले. या दोघांनीही वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. गुुरुवारी कुटुंब न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला.गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या दोघांनी घटस्फोटासाठी वांद्रे कुटुंब न्यायालयात अर्ज केला होता. त्या दोघांची भारतासह, स्पेन व लंडन येथील संपत्ती व बँकेमधील ठेवीचेही या घटस्फोटाद्वारे विभाजन करण्यात आले आहे. या दोघांनी आपापसांत समजूतदारपणे घटस्फोट घेतला.इंद्राणी (४५) व पीटर (६७) यांनी २००२ मध्ये विवाह केला. हे दोघेही शीना बोरा हत्येप्रकरणी आरोपी असून सध्या ते कारागृहात आहेत. इंद्राणी भायखळ्याच्या तर पीटर आर्थर रोड कारागृहात आहे.इंद्राणीच्या आधीच्या विवाहापासून जन्माला आलेली शीना (२४) हिची संपत्तीच्या वादातून एप्रिल २०१२ मध्ये इंद्राणीनेच हत्या केली. तिच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप पीटरवर आहे.२०१५ मध्ये इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर शीना बोराच्या हत्येचे बिंग फुटले होते. त्यानंतर पोलिसांनी इंद्राणी, तिचा आधीचा पती संजीव खन्ना व पीटर मुखर्जी यांना अटक केली.

टॅग्स :इंद्राणी मुखर्जीमुंबई