Join us

इंद्राणीने दाखविलेल्या आमिषाला बळी पडलो

By admin | Updated: August 30, 2015 02:41 IST

‘शीनाची हत्या केलीस तर हजारो कोटींच्या मालमत्तेचा भागीदार होशील, या इंद्राणीने दाखविलेल्या आमिषाला बळी पडलो आणि तिला साथ दिली,’ अशी धक्कादायक कबुली शीना बोरा हत्याकांडातील आरोपी

मुंबई : ‘शीनाची हत्या केलीस तर हजारो कोटींच्या मालमत्तेचा भागीदार होशील, या इंद्राणीने दाखविलेल्या आमिषाला बळी पडलो आणि तिला साथ दिली,’ अशी धक्कादायक कबुली शीना बोरा हत्याकांडातील आरोपी संजीव खन्नाने खार पोलिसांना दिली. घटस्फोट झाल्यानंतर २०१२च्या सुरुवातीपासून इंद्राणीने अशाप्रकारची लालूच दाखवून शीना हत्येच्या कटात ओढले, असेही खन्नाने पोलिसांना सांगितले आहे.इंद्राणीने शीनासोबत पोटचा मुलगा मिखाईलच्याही हत्येचा कट आखला होता. शीनाची हत्या गळा आवळून तर मिखाईलला मनोरुग्ण करून वाटेतून बाजूला काढण्याचे इंद्राणीच्या मनात होते. शीनाची हत्या झाली त्या दिवशीच इंद्राणी व संजीवने मिखाईलच्या पेयात विषारी पदार्थ मिसळला होता. पुढील काही दिवस ठरवून असा विषप्रयोग त्याच्यावर करण्यात येणार होता. त्यामुळे तो मनोरुग्ण बनला असता. नंतर त्याला वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते, असेही संजीवने सांगितल्याचे समजते. संजीवने उघड केलेल्या माहितीची शहानिशा पोलीस करणार आहेत. तसेच संजीव व या गुन्ह्यात अटक झालेला इंद्राणीचा ड्रायव्हर श्याम राय यांनी हत्येबाबत दिलेले तपशीलही जुळवून पाहणार आहेत. शीना व मिखाईल यांचा अडथळा दूर झाल्यानंतर मालमत्तेत चार भागीदार उरतील. त्यात पीटर, इंद्राणीसह संजीव व त्याची कन्या विधी यांचेच नियंत्रण राहील, असे आमिष इंद्राणीने दिले होते. शीनाच्या हत्येत मदत करावी यासाठी इंद्राणी वरचेवर फोन करी, एसएमएस करीत असे. पीटर यांना पहिल्या पत्नीपासून (शबनम) रूबीन व राहुल अशी दोन मुले आहेत. मात्र दोन्ही मुलांचा ओढा पीटर यांच्यापेक्षा शबनमकडे अधिक आहे. त्यामुळे मालमत्तेवर हक्क सांगण्यास हे दोघे येणार नाहीत, असा विश्वासही इंद्राणीने दिला होता.