Join us  

जय हो! मुंबईत देशातील सर्वात लहान व्यासाच्या भूमिगत मलजल बोगद्याचे खोदकाम पूर्ण, नवा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 7:42 PM

कोस्टल रोड आणि जलबोगद्याच्या खोदकामात विक्रम केल्यानंतर महापालिकेने आता आणखी एक विक्रम नोंदविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई -  कोस्टल रोड आणि जलबोगद्याच्या खोदकामात विक्रम केल्यानंतर महापालिकेने आता आणखी एक विक्रम नोंदविला आहे. वांद्रे - खार परिसरातील मलजल वाहिन्यांवरील ताण कमी करण्यासाठी वांद्रे अंतर्गामी उदंचन केंद्र ते जयभारत उदंचन केंद्र या १.८५७ किलोमीटर अंतराच्या भूमिगत मलजल बोगद्याचे खनन अवघ्या १३ महिन्यांमध्ये पूर्ण केले आहे. देशातील हा सर्वात लहान व्यासाचा मलजल बोगदा ठरला आहे. त्यासाठी ‘अर्थ प्रेशर बॅलन्स टीबीएम’ या बोगदा खनन तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर करण्यात येत आहे. 

प्रमुख अभियंता (मुंबई मलनिःसारण प्रकल्प) या खात्याच्या वतीने हे बांधकाम करण्यात येत आहे. लॉकडाऊनचा कोणताही परिणाम या प्रकल्पावर होऊ न देता या मलजल बोगद्याचे काम सुरु ठेवले आहे. भविष्‍यकालीन सुमारे ७२ दशलक्ष लीटर इतक्या क्षमतेने मलजल वाहून नेण्याची क्षमता समोर ठेवून या प्रकल्पाचे आरेखन, संरचना करण्यात आले आहे. या बोगद्याचे बांधकाम सेंगमेंटल लाईनिंग पद्धतीने करण्यात येत आहे. भविष्‍यात चिंबई उदंचन केंद्राकडे येणारा मलजल प्रवाह हा या प्रस्‍तावित मलजल बोगद्यामध्‍ये घेण्‍यासाठी माहिम कॉजवे जंक्‍शन (मदर व सन गार्डन स्‍टॅच्‍यू) येथे शाफ्ट देखील बांधले जात आहे. सन २०५१ पर्यंतचा विचार करुन हे नियोजन करण्यात येत आहे. 

मलजल वाहिन्यांवरील ताण कमी.... बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जय भारत उदंचन केंद्राकडे जाणारा मलजल या बोगद्याच्या माध्यमातून वांद्रे अंतर्गमी उदंचन केंद्र येथे वळविण्‍यात येणार आहे. परिणामी, वांद्रे, खार परिसरातील मलजल वाहिन्यांवरील ताण कमी होऊन त्यांची क्षमता वाढणार आहे. भविष्‍यात जय भारत उदंचन केंद्र व चिंबई उदंचन केंद्र बंद करणे शक्य असल्याने त्‍यावरील देखभालीच्‍या खर्चामध्‍ये बचत होणार आहे. 

असे सुरु आहे काम... या बोगद्याद्वारे मलजल प्रवाह हा उताराच्‍या दिशेने (गुरुत्‍चाकर्षण) वांद्रे अंतर्गामी उदंचन केंद्रापर्यंत पोहोचणार आहे. या संपूर्ण १.८५७ किलोमीटर बोगद्याचे काम करताना मध्‍ये कुठलीही खोदविहीर (शाफ्ट) न घेता, बोगदा खनन संयंत्र (टीबीएम) द्वारे जलदग‍तीने करण्‍यात आले आहे. मलजल बोगद्यासाठी देशात प्रथमच अर्थ प्रेशर बॅलन्स हे तंत्रज्ञान वापरात आणले आहे. मृदू,ओलसर जमीन असताना वेगाने मात्र तितक्याच सुरक्षित पद्धतीने खनन व बांधकाम करायचे असते, तिथे या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येतो. उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर, मुंबई मलनिःसारण प्रकल्पाचे प्रमुख अभियंता अतुल राव, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, सहायक अभियंता राजेश पाटील, दुय्यम अभियंता राहूल अहिरे आणि प्रणाली धामणस्कर हे या प्रकल्पामध्ये योगदान देत आहेत. मेसर्स टाटा कन्‍सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड हे प्रकल्प सल्लागार आहेत. तर मेसर्स आय.टी.डी. सिमेंटेशन इंडिया लिमिटेड हे ठेकेदार आहेत. 

भूमिगत मलजल बोगद्याचे खनन -  ४ डिसेंबर २०२० रोजी वांद्रे केंद्रापासून सुरु काम पूर्ण - १७ जानेवारी २०२२ प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण प्रकल्पाची डेडलाईन - डिसेंबर २०२२ मलजल बोगद्याची लांबी - १,८५७ मीटर अंतर्गत व्‍यास - २.६० मीटर बहिर्गमी व्‍यास - ३.२० मीटर 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका